Raosaheb Danve On Sanjay Raut : निवडणूक आयोग बरखास्त करायचं तर त्या जागेवर संजय राऊतांना नेमायचं का..? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला. ते चिंचवडमध्ये बोलत होते. शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांना दिलं, त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. संजय राऊत यांनी निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणी केली होती. राऊतांच्या या टीकेला दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते चिंचवड पोटनिवडणुकीच्या भाजप उमेदवार अश्विनी जगतापांच्या प्रचारा दरम्यान बोलत होते.
निवडणूकजवळ आली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहे. या निवडणुकीत अश्विनी जगताप या सर्वात जास्त मतांनी निवडून येणार आहेत. देशात राज्यात भाजपच्या बाजूने वातावरण आहे. 2014 नंतर मोदींनी केलेला विकास मागील सहा महिन्यांत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय त्यामुळे जनता भाजपच्या बाजूने मतदान करणार हे नक्की आहे. शिवाय पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष्मण जगताप यांनी केलेलं काम आहे, त्या बळावर अश्विनी जगताप निवडणूक जिंकणार, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
तर राष्ट्रवादी सत्तेत असती -
राष्ट्रवादीकडून विकास झाला असता तर 2014 आणि 2019 ला राष्ट्रवादीची सत्ता आली असती. या राज्यात राष्ट्रवादी स्वबळावर सत्ता कधीच आणू शकली नाही. राष्ट्रवादीने केवळ फोडतोडीचं राजकारण केलं. वसंतदादा ते आतापर्यंत राष्ट्रवादी अजूनही सत्तेवर येऊ शकली नाही. विकास केला असता तर नक्कीच राष्ट्रवादी स्वबळावर सत्तेत बसली असती, असे दानवे म्हणाले.
आम्ही स्वार्थी की ते स्वार्थी..?
स्वार्थी राजकारण कोण करत हे बोलणाऱ्याने पाहिलं पाहिजे. सकाळी सकाळी आमच्याबरोबर आले. स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. गणितं जमली नाहीत समजू लागले त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेशी हातमिळवणी केली. आम्ही स्वार्थी की ते स्वार्थी..? मूळ भाजपच्या विचाराला आम्ही फाटा देत नाही. यांनी नेहमीच त्यांच्या विचाराला फाटा दिला, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
ठाकरेंचा बोलवता धनी कोण ?
उद्धव ठाकरेंचा बोलवता धनी कोण आहे? ही गोष्ट लक्षात घ्या. हा देश लोकशाहीला माणनारा देश आहे. जो कोणता राजकीय पक्ष लोकशाहीला सोडून काम करेल त्याला जनता त्याची जागा दाखवेल. हुकूमशाही हे आणत आहेत. खरे हुकूमशहा तर हे आहेत. नैराश्यातून हे बोलत आहेत, असे दानवे म्हणाले.
मोडतोडीचं राजकारण -
मोडतोड त्यांनी केली की आम्ही केली, हे सगळ्यांना माहीत आहे. आमचं असलेलं त्यांनी मोडलं. त्यांचं असलेलं आम्ही मोडलं तर फरक काय पडला, असा सवाल दानवेंनी उपस्थित केला.
2 हजार कोटी सौदा
दोन हजार कोटींचा सौदा कुणी केला, याचा निर्णय कोर्टात होतील. सर्वजण कोर्टात जातील. 2 हजार कोटी आले कुठून, गेले कुठून याची सगळी चौकशी केली जाईल. कोटी वगैरे हे त्यांनाच माहिती. भाजप असले व्यवहार कधी करत नाही, असे दानवे म्हणाले.