पिंपरी - चिंचवड : बैलगाडा (Bailgada Sharyat) शौकीनांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरणार आहे. जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, एकशे सोळा दुचाकी आणि रोख रकमांची बक्षीस विजेत्या मालकांना दिली जाणारेत. तब्बल दीड कोटींच्या घरात बक्षीसांची ही रक्कम जातीये. भाजपचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी या शर्यतीचं आयोजन केलंय. 28 ते 31 मे दरम्यान होणारी ही देशातील सर्वात मोठी शर्यत असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळेच देशासह राज्यातील दिग्गज नेत्यांची इथं हजेरी लागणार आहे. 


अठ्ठावीस लाखांचा एक जेसीबी, एक बोलेरो, अकरा लाखांचे तीन ट्रॅक्टर, साडे तीन लाखांच्या दोन बुलेट अन 80 लाखांच्या 114 दुचाकी.... बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना ही वाहन बक्षीस रूपात मिळणार आहेत. यासाठी बैलजोड्यांना पिंपरी चिंचवडचा बैलगाडा घाट मारावा लागणार आहे. तब्बल दीड कोटींच्या घरात बक्षीसांची रक्कम जात असल्याने ही देशातील सर्वात मोठी शर्यत आहे. असा दावा पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल  जाधवांनी केलाय. मधल्या काळात बैलगाडा शर्यतींना ब्रेक लागला, त्यामुळं बैलगाडा शौकिनांचा हिरमोड झाला होता. पण न्यायालयीन लढा जिंकला अन् घाटात पुन्हा धुरळा उडू लागला. तेव्हाच देशातील सर्वात मोठ्या शर्यतीची अनुभती द्यायची हे ठरवलं होत. याच संकल्पनेतून भाजपचे आमदार महेश लांडगे आणि समर्थकांनी या जंगी शर्यतीचे आयोजन केलं आहे. 


भाजपचे राष्ट्रीय नेते प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटलांसह अनेक दिग्गज नेते ही या शर्यतीला हजेरी लावणार आहेत. त्याअनुषंगाने स्पर्धेची संपूर्ण तयारी झालीये. बैलगाडा शर्यतीचा घाट ही सज्ज आहे. आज शर्यतीत सहभागी होण्यासाठी बैलगाडा मालकांनी नोंदी केल्या. अपेक्षेप्रमाणे दोन हजार बैलजोड्यांची नोंद झालीये. म्हणूनच 28 ते 31 मे दरम्यान भरणारी शर्यत एक दिवस आधी सुरु करण्याची तयारी सुरु झालीये. सर्व बैलगाड्यांना संधी मिळावी म्हणून हा पर्याय अवलंबला जाऊ शकतो, अस माजी महापौर नितीन काळजेंनी माहिती दिली.


देशातील ही सर्वाधिक मोठी शर्यत असल्याचा दावा केला जात असल्यानं राज्यभरातून बैलगाडा मालक इथं गर्दी करतायेत. जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, विविध दुचाक्या जिंकण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरुये. पण प्रत्यक्षात जी बैलजोडी घाट मारेल त्यांच्याच मालकाच्या घरी ही वाहन पोहचतील.