Pune H3N2 Update : पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) धोका वाढताना दिसत आहे. जानेवारीपासून पुणे शहरात 162 तर पिंपरी-चिंचवडमध्ये चार H3N2 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 73 वर्षीय व्यक्तीचा H3N2 मुळे मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिका (PMC) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) सतर्क झाले आहेत. रुग्णाचा बळी गेल्याने महापालिका हाय अलर्टवर दिसत आहे. कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन तयारीला लागलं आहे. 


पिंपरी-चिंचवडने H3N2 रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाच सरकारी रुग्णालयात खाटा राखीव ठेवल्या आहेत. या प्रत्येक रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये पालिकेने दहा खाटा राखीव ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे  पुणे महानगरपालिकेने H3N2 रुग्णांच्या उपचारासाठी शहरात 250 खाटा राखून ठेवल्या आहेत.


आम्ही नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालयात H3N2-संक्रमित रुग्णांसाठी 50 अलगाव खाटा राखून ठेवल्या आहेत. जुन्या बाणेर रुग्णालयात सुमारे 200 खाटा ठेवण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास क्षमता वाढवता येईल, असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितलं आहे. 


कोणत्या महिन्यात किती रुग्ण?


संपूर्ण शहरात जानेवारीमध्ये 27, फेब्रुवारीमध्ये 89 आणि मार्चमध्ये 46 रुग्ण आढळून आले. सध्या शहरात 13 सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी सहा रुग्ण सौम्य लक्षणांसह होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि सात रुग्णांवर चार वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


रुग्णालयांची यादीः


1) नवीन थेरगाव हॉस्पिटल


2) नवीन भोसरी हॉस्पिटल


3) न्यू जिजामाता हॉस्पिटल


4) प्रभाकर कुटे मेमोरियल हॉस्पिटल, आकुर्डी


5) यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय 


काळजी घेण्याचं आवाहन


शहरात सध्या व्हायरलची म्हणजेच H3N2 या व्हायरसची साथ असून, रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे. जानेवारी ते मार्च या दरम्यान पुणेकरांना बाधा झाली आहे.


वातावरण बदलांमुळे निम्मे पुणे आजारी


मागील काही दिवसांपासून पुण्यात सतत वातावरणात बदल होत आहे. याच बदलत्या वातावरणामुळे पुणेकरांना सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे. यात लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वेगवेगळी लक्षणं जाणवत आहे. त्यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासोबतच मास्क वापरण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.