पुणे : कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी ऊसाचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या महिलेला मारहाण केल्याची तक्रार कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या कोथरुड पोलीस स्टेशनला पोहोचल्या.
कोथरुड भागातील रामबाग कॉलनीतला गणेश कुंज सोसायटीच्या समोर एक ऊसाचे गुऱ्हाळ आहे. हे गुऱ्हाळ अनधिकृत जागेत सुरु असून त्यामुळे सोसायटीमधील नागरिकांना त्रास होत असल्याचं गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे. गुऱ्हाळामुळे डास आणि माशा वाढल्या असून सोसायटीतील काहींना डेंग्यूची लागण झाल्याचही गणेश कुंज सोसायटीतील रहिवाांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी मेधा कुलकर्णी यांच्यासह हे गुऱ्हाळ हटवण्याचा प्रयत्न केला. हे गुऱ्हाळ चालवणाऱ्या दीपाली चव्हाण नावाच्या महिलेशी आणि तिच्या पतीशी त्यांची झटापट झाली. यावेळी गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तींसोबत मेधा कुलकर्णी यांनी मारहाण केल्याची तक्रार दीपाली चव्हाण नावाच्या महिलेने केली आहे.
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दीपाली चव्हाण चालवत असलेलं गुऱ्हाळ अनधिकृत असल्याचं आणि परिसरातील लोकांना त्याचा त्रास होत असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.