Kasba By Election : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kasba By Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena ) भाजपला (bjp) पाठींबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी याबाबतची भूमीका जाहीर केल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली. "हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. त्यामुळेच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले असल्याचे वागस्कर यांनी सांगितले. 


पुण्यातील मनसे नेत्यांनी आज राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी पुण्यातील कसबा विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बाबू वागस्कर, अजय मोरे, किशोर शिंदे आदी मनसेचे पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित होते. 


कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि मित्र पक्षाच्या युतीतर्फे हेमंत रासने हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या संदर्भात मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्थानिक नेत्यांनी राज यांची आज भेट घेतली. हिंदुत्व आणि विकास याच्या बाजूनेच आपला कल असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा विधानसभा निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने यांना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.  


निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज मनसेचे प्रवक्ते आणि नेते अनिल शिदोरे प्रदेश, नेते बाबू वागस्कर, उपाध्यक्ष बाळा शेंडगे, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि कसबा विभागाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतली. यावेळी वागस्कर यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.   


दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही कसब्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे कसब्यातून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र ती उमेदवारी भाजपच्या हेमंत रासने यांना देण्यात आली. तर महाविकास आघाडीकहून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उदेवारी देण्यात आली. त्यामुळे आता हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे.  


महत्वाच्या बातम्या


Pune Bypoll Election : कसब्यात महाविकास आघाडीला दिलासा, मात्र भाजपचं टेन्शन वाढण्याचं कारण काय?