मुंबई/पुणे : महाराष्ट्र केसरी हा प्रतिष्ठेचा किताब पटकावणाऱ्या पैलवानाला यंदा बक्षीस म्हणून जीपही मिळणार आहे. मानाच्या चांदीच्या गदेसोबतच महिंद्र अँड महिंद्र कंपनीची थार ही जीप देऊन गौरवण्यात येईल.


महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात विजेत्या पैलवानाला चारचाकी वाहन देण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. याआधी 2013 साली तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी विजेता ठरलेल्या नरसिंग यादवचा स्कॉर्पियो देऊन गौरव करण्यात आला होता.

यंदा 20 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र केसरीच्या लढतीत उपविजेत्या ठरणाऱ्या पैलवानाला बुलेट देण्यात येणार आहे.

भारताचा ऑलिम्पियन पैलवान नरसिंग यादवनं 2011, 2012 आणि 2013 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. चाळीसगावचा विजय चौधरी गेली तीन वर्षे सातत्यानं महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावत आहे. पण सध्या डीवायएसपीच्या ट्रेनिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे तो यंदा महाराष्ट्र केसरीत खेळू शकणार नाही.

चंद्रहार पाटील आणि अभिजीत कटके यांच्याबरोबरच लातूरचा सागर बिराजदार, कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा माऊली जमदाडे, सातारच्या मोही गावचा किरण भगत, पुणे शहरचाच साईनाथ रानवडे, बुलढाण्याचा बाला रफिक शेख, मुंबई उपनगरचा विक्रांत जाधव ही नावंही महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीत आहेत. या आठ पैलवानांपैकीच कुणीतरी एक की, कुणीतरी नवा पठ्ठ्या महाराष्ट्र केसरी जिंकतो याची कल्पना रविवारी भूगावच्या मैदानात येईल.