पुणे : गुजरातमध्ये भाजपच्या विजयानंतर पुण्यात भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकवले आहेत. एव्हरी डे इज नॉट काक 'डे' अशा आशयाची पोस्टर्स पुणे महापालिकेजवळ लावण्यात आली आहेत.
स्वतंत्र यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करुन काकडेंनी गुजरातच्या निकालाचं भाकित केलं होतं. यात त्यांनी गुजरातमध्ये भाजपचा दारुण पराभव होईल असं सांगितलं होतं. तसेच, काँग्रेस बहुमताच्या जवळ असेल असंही भाकित त्यांनी वर्तवलं होतं. त्यामुळे पुणे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता.
मात्र आज गुजरात निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. तर काँग्रेसला बहुमतापासून 12 जागा दूर राहावं लागलं. त्यामुळे काकडेंचं भाकित चुकल्यानं पक्षांतर्गत विरोधकांना आयती संधी मिळाली.
भाजपमधील काकडे विरोधकांनी पुणे महापालिकेसमोर पोस्टर लावून त्यांच्याविरोधात पोस्टर लावून, त्यांचा निषेध केला. एव्हरी डे इज नॉट ‘काक’डे, असे या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान, संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपल्या भाकितावरुन यू-टर्न घेतला आहे. मोदींचा करिश्मा गुजरातच्या जनतेनं दाखवून दिला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही भाजप निवडून येईल, असंही भाकित त्यांनी व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या
VIDEO : गुजरात निवडणूक निकाल : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंची पत्रकार परिषद (भाग 11)
गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार नाही : खा. संजय काकडे