Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra kesari) आखाडा कुणी भरवायचा यावरून आता कुस्तीगीर संघटनांमध्ये वादाचा फड रंगला आहे. पुण्यात (Pune) महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असली तरी शरद पवार अध्यक्ष असलेली पण बरखास्त केलेली जुनी कुस्तीगीर परिषद आणि भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांनी स्पर्धा भरवण्याचा पवित्रा घेतल्यानं वाद निर्माण झालाय.
नव्या कुस्तीगीर परिषदेनं 14 ते 30 डिसेंबर दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलंय. तर दुसरीकडे शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेल्या गटानं ही स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा केलाय. पवार आणि लांडगे यांच्या नेतृत्वाखालील कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला न्यायालयानं स्थगिती दिलीय. त्यामुळे ही स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच आहे असा दावा बाळासाहेब लांडगे यांनी केलाय.
कुस्तीगीर परिषदेतलं राजकरण
राज्यात सत्ताबदल होताच गेल्या अनेक दशकांपासून राज्य कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व असलेल्या शरद पवारांना या बरखास्तीमुळे धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद हे भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्याकडे आहे. यातच आता भाजपचे खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ज्यात शरद पवार हे मागील अनेक वर्षांपासून अध्यक्ष राहिले आहेत. त्याचा कारभार सांभाळणारे बाळासाहेब लांडगे हे मागील 40 वर्षांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिव पदावर होते, पण त्यांच्या कार्यकाळ हा कायम वादग्रस्त राहिला आहे. अनेकदा तक्रारी करून सुद्धा काहीच झालं नाही. तसेच भारतीय कुस्तीगीर संघानं घ्यायला लावलेल्या स्पर्धांचं आयोजनच होत नसल्याचा ठपका ठेवत भारतीय कुस्तीगीर संघानं ही करवाई करत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची कार्यकारणीच रद्द केली होती.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात
महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे. 900 कुस्तीगीर यांच्या सहभागात डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. 33 जिल्ह्यातील 11 महापालिकांमध्ये 45 तालीम संघातील 900 मल्ल स्पर्धेत होणार सहभागी होणार आहेत. नामांकित 40 मल्ल सुद्धा घेणार या स्पर्धेत भाग घेणार आहेत. स्पर्धेचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान करणार असून डिसेंबर महिन्यात सहा दिवस ही स्पर्धा होणार आहे. यंदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा मान पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.