पुणे : महाराष्ट्र केसरीत माती विभागातून विजय चौधरीनं तर मॅट विभागातून अभिजीत कटकेनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. पुण्यातल्या वारजे गावात सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत माती आणि मॅट विभागाचे अंतिम सामने झाले.
विजय चौधरी महाराष्ट्र केसरी किताबाची हॅटट्रिक साजरी करणार की अभिजीत कटके पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार? या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळणार आहे. महाराष्ट्र केसरीची अंतिम लढाई उद्या संध्याकाळी खेळवली जाणार आहे.
डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माती विभागाच्या अंतिम फेरीत विजय डोईफोडेला चीतपट केलं. विजयनं उपांत्य लढतीत सांगलीच्या मारुती जाधववर मात केली. त्याआधी त्याने तिसऱ्या फेरीत यवतमाळच्या शुभम जाधवला हरवलं होतं आणि मग साताऱ्याच्या किरण भगतला चीतपट करुन कमालीचा विजय मिळवला होता.
महाराष्ट्र केसरीच्या मॅट विभागात अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. सागर बिराजदारवर मात करत अभिजीतने महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी गाठली आहे.