Maharashtra Inflation Updates : लवकरच घराघरांत बाप्पाचं आगमन होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. बाप्पा घरी आल्यावर काय करावं आणि काय नाही, असं होतं. बाप्पाच्या आदरातिथ्यासाठी घरात चमचमीत पदार्थांची रेलचल असते. पण, यंदा बाप्पाच्या आदरातिथ्यात काहीतरी कमी राहतं की, काय? अशी चिंता सर्वसामान्यांना भासत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं कारण ठरतेय वाढती महागाई. यंदा सर्वच पदार्थांच्या किमतींत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत. तब्बल 10 ते 20 टक्क्यांनी भाज्यांचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहेत. अशातच सध्या कोथिंबीर (Kothimbir Rate) आणि मेथीच्या (Mathi Rates) जुडी तर विक्रमी दरात विकली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 


जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये रविवारी, 1 सप्टेंबर 2024 ला कोथिंबिरीच्या (Coriander Rates) एका जुडीला तब्बल 200 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाल्याचं पाहायला मिळालं. तर मेथीच्या भाजीला 110 रुपये प्रति जुडी असा दर मिळाला. कोथिंबीरीला 20 हजार रुपये शेकडा तर मेथीचा दर 10 हजार रूपये शेकडा भाव मिळाला. आजपर्यंतच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या इतिहासातील 20 हजार रुपये प्रति शेकडा हा उच्चांकी दर कोथिंबिरीला मिळाला आहे. 


दरम्यान, मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागांत पावसानं दडी मारली असली, तरीदेखील पुणे ग्रामीणसह, मराठवाड्यात मुसळधार पावसानं हैदोस घातल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतमालामध्ये कोथिंबीर, मेथीचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे कोथिंबीर आणि मेथीची बाजारात आवाक फारच कमी आहे. अशातच, बाजारात फारच कमी प्रमाणात कोथिंबीर, मेथी उपलब्ध आहे.


शेतमालाची आवाक कमी झाल्यामुळे कोथिंबीर आणि मेथीच्या दरांवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, आधीपासूनच महागाईनं पिचलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा चाप बसणार आहे. 


पाहा व्हिडीओ : कोथिंबीर, मेथीचे दर गगनाला भिडले, सर्वसामान्यांना ऐन सणासुदीत महागाईचा झटका