Khelo India Youth Games 2022: खेलो इंडिया स्पर्धेत यावर्षी देखील महाराष्ट्र हॅट्रीक करेल, असा विश्वास क्रीडा मंत्री सुनिल केदार आणि राज्य क्रीडा मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. ही स्पर्धा 3 जून पासून हरियाणा येथे सुरू होत आहे. त्यासाठी छत्रपती क्रीडा संकुलात सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात अदिती तटकरे आणि सुनिल केदार यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ही आशा व्यक्त केली आहे.


यंदा ही हरियाणा येथे स्पर्धा होत आहेत. बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुलातील शिबिरानंतर खेळाडूंना विमानाने तेथे नेले जाणार आहे. खेळाडूंनी नैसर्गिक खेळ खेळून महाराष्ट्राचे नावलौकिक करावे. मागील दोन स्पर्धांपासून महाराष्ट्र खेलो इंडिया युथ गेम्समध्ये अव्वल स्थानी आहे. यंदाही ते स्थान कायम ठेवून हॅट्ट्रक करेल,अशी मला आशा आहे. अशा प्रकारच्या शुभेच्छा क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या


आजपर्यंत या स्पर्धेत खेळाडूंनी महाराष्ट्राचा पताका कायम फडकवत ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीतील हे खेळाडू आहेत. ते कायमच महाराष्ट्राचे नाव उंचावत ठेवतील. स्पर्धेत पदकविजेत्या खेळाडूंना अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकासाठी तीन लाख रूपये, दोन लाख रूपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाख रूपये दिले जाणार आहेत. बक्षिसांची रक्कम वाढविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तो नक्कीच खेळाडूंचा उत्साह वाढविणारा ठरेल. बालेवाडी येथे सुरू असलेल्या सराव शिबिरास मी स्वतः भेट दिली आहे. त्यांचा सराव पाहून नक्कीच महाराष्ट्र अग्रेसर राहिल. देशात कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक सुविधा दिल्या जातील, असं मत क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले.


महाराष्ट्राचे खेळाडू प्रत्येक क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करीत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासन विशेष सुविधा दिली आहे. यापूर्वी खेळाडूंना आपापल्या जिल्ह्यातून प्रवास करून स्पर्धेच्या ठिकाणी पोचावे लागत असे. त्यामुळे त्याचा कामगिरीवर परिणाम होत असे. परंतु आता महाराष्ट्र सरकार आणि क्रीडा विभागाने खेळाडूंना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून जाण्या-येण्यासाठी थेट विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या स्पर्धेच्या वेळीही विमान प्रवासाची सेवा दिली होती. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल ६० लाख रूपये खेळाडूंच्या विमानप्रवासावर खर्च केले होते, राज्य क्रीडा मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.