Pune Crime : सहा लाख रुपयांचे वाहन चोरी करणाऱ्या अट्टल वाहन चोराला खुळेवाडी विमाननगर परिसरातून अटक केली आहे. त्याने चोरलेल्या सहा लाख रुपये किमतीची 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
चंदन नगर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करणाऱ्याने आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध सुरु केला. आरोपी पुण्यातील चंदन नगर परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चक्रे हलवली. त्यानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक गणेश माने यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पुणे-नगर हायवे पोलीस पथकाने नगर हायवेवर सापळा रचून आरोपीला पकडले आहे.
विनोद आनंद कांबळे असं 30 वर्षीय आरोपीचं नाव आहे. जेरबंद केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. सराईत आरोपीने आतापर्यंत पुणे, मुंबई, सांगली, अहमदनगर, नागपूर या शहरातून एका साथीदाराच्या सहाय्याने चोरी केल्याचं सांगितलं. त्याच्याकडून आतापर्यंत एकून सहा लाख किंमतीच्या 13 मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
प्रत्येक शहरात त्याच्या नावे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यात 9,मुंबईत 1, नागपूरमध्ये 1, सांगलीत 1, अहमदनगरमध्ये 1 असे एकूण 13 वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहे. यापुर्वी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातदेखील दोन अट्टल वाहनचोरांकडून वाहनचोरीचे एकूण 15गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याबरोबरच एकूण 28 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दरम्यान, पुणे शहरात वाहन चोरीचा वाढता आलेख दिसतो आहे. काही दिवसांपासून शहरातील वाहन सुरक्षित नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलिसांनी नियम कडक करावे किंवा यासंदर्भात कडक कारवाई करावी, असं स्थानिकांचं मत आहे.