पुणे : पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सणासुदीच्या दिवसांत ही संख्या दुपटीने वाढते. हीच संख्या लक्षात घेऊन पुणे नागपूर धावणाऱ्या रेल्वेला पाच जास्तीचे डबे जोडण्यात आले आहेत. रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सोयीचा होणार आहे. मध्य रेल्वेने सणासुदीच्या अगोदर अजनी-पुणे आणि नागपूर-पुणे दरम्यानच्या हमसफर एक्स्प्रेसला प्रत्येकी 5 डबे जोडले आहेत. याआधी या पूर्ण वातानुकूलित साप्ताहिक ट्रेनमध्ये 15 LHB डबे होते. आता ही संख्या 20 वर गेली आहे. प्रत्येक डब्यातील 72 बर्थ लक्षात घेता, प्रत्येक ट्रेनमध्ये किमान 360 जादा प्रवासी बसवता येतील. यामुळे सर्वाधिक संख्या असलेल्या नागपूर-पुणे मार्गावरील वेटिंग लिस्टमधील प्रवाशांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.


इंदूर-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसचा नागपूरपर्यंत विस्तार


रेल्वे मंत्रालयाने इंदूर-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसचा नागपूरपर्यंत विस्तार केला असून त्याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रवाशांना झाला आहे. ट्रेनला आता इटारसी येथे थांबा असेल आणि नागपूर-भोपाळ-उज्जैन-इंदूर दरम्यानचा प्रवास वेळ 8 तासांपर्यंत कमी करेल. या विस्ताराचा उद्देश कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि ट्रेनला व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य बनवणे हा आहे. पूर्वी भोपाळ-इंदूर वंदे भारतला कमी अंतरासाठी जास्त भाडे असल्यामुळे प्रवाशांची पसंती कमी होती. 


प्रवाशांना दिलासा...


विदर्भातील अनेक विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येत असतात. पुण्यातील प्रत्येक परिसरात विदर्भातील विद्यार्थी राहतात. त्यात या विद्यार्थ्यांना दिवाळी किंवा सणासुदीच्या दिवसात प्रवासासाठी त्रास सहन करावा लागतो. तिकीटं न मिळणं किंवा कमी डबे असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे तिकीटं वेटींगवर असतात. त्यामुळे रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि इतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 


स्लीपर कोचच्या बसेसच्या तिकिटांची किंमत परवडेना...


विदर्भात जाण्यासाठी काही ट्रेन आणि बाकी स्लिपर कोच बसेसची सोय आहे. मात्र स्लिपर कोच बसेसचे अपघात पाहता अनेकांना या बसने प्रवास करताना धडकी भरते. बस सोयीची असली तरीदेखील सुरक्षित नसल्याचं प्रवाशांकडून बोललं जात आहे. त्यातच तिकिटांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. साधारण प्रत्येकी 1500 ते 1800 रुपये तिकिट आकारलं जातं. त्यात सणासुदीच्या दिवसांत ही किंमत तिप्पट होते. अनेकांना ही किंमत परवडणारी नसते. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. 


इतर महत्वाची बातमी-


भारत-पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेची विशेष ट्रेन; रेल्वेकडून डिटेल्स जाहीर, पाहा कधी अन् कुठून सुटणार ट्रेन?