पुणे : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी उद्या राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात चाकण येथील आंदोलनादरम्यान पीएमपीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पीएमपी प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात आली असून शहर आणि हद्दीबाहेरील अनेक मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. एकूण 14 मार्गावर हे बदल करण्यात आले असून काही ठिकाणी शहरहद्दीपर्यंत बसेस सुरु राहणार आहेत.
विविध मागण्यांसाठी उद्या (गुरुवारी) राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून पुणे शहर आणि हद्दीलगतच्या परिसरामध्येही आंदोलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पीएमपीकडून काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.
वाहतूक नियंत्रण कक्ष 24 तास सुुरु ठेवण्यात येणार असून नागरिकांनी माहितीसाठी 020- 24503206 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पीएमपीचे कोणते मार्ग बंद असणार?
1) पुणे नाशिक रोड – या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार आहेत.
2) निगडी ते चाकण – या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार आहेत.
3) एमआयडीसी, वडगाव चाकण रस्ता – या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार आहेत.
4) पुणे मुंबई रोड – या रस्त्याने निगडीच्या पुढे देहूगाव, वडगाव, कामशेत आणि किवळेकडे जाणारे सर्व बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.
5) पौड रस्ता – या रस्त्याने संचलनात असणारे बसमार्ग फक्त चांदणी चौकापर्यंतच सुरु राहणार आहेत.
6) सिंहगड रोड – वडगाव धायरीच्या पुढे जाणारे सर्व बसमार्ग बंद राहणार आहेत.
7) मांडवी बहूली रोड – या रोडने सुरु असणारे बसमार्ग फक्त वारजे माळवाडी पर्यंतच सुरु राहणार आहेत.
8) पुणे सातारा रोड – या रोडने नसरापूर, कोंढणपूर, शिवापूरकडे संचलनात असणारे बरमार्ग फक्त कात्रजपर्यंतच सुरु राहणार आहेत.
9) कात्रज सासवड रोड (बोपदेव घाट)- बोपदेव घाटमार्गे जाणारे सर्व मार्गावरील बस येवलेवाडीपर्यंतच सुरु राहणार आहेत.
10) हडपसर सासवड रोड- या रस्त्याने संचलनात असणारे सर्व मार्ग फुरसुंगी पर्यंत सुरु राहणार आहेत.
11) पुणे सोलापूर रोड – या रस्त्याने संचलनात असणारे सर्व मार्ग शेवाळवाडी आगारपर्यंत सुरु राहणार आहेत.
12) पुणे नगर रोड – या रस्त्याने संचलनात असणारे सर्व बसमार्ग वाघोलीपर्यंत सुरु राहणार आहेत.
13) हडपसर वाघोली मार्ग- कोलवडी, साष्टे मार्गे जाणारा बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
14) आळंदी रोड – आळंदी ते वाघोली मार्गे मरकळ हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद मुळे उद्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भात आदेश दिले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था व महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
चाकण बंद
चाकणमध्ये रास्ता रोको होणार नसून शहर बंद ठेवण्यात येणार आहे.
मावळ बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील उर्से टोल नाका : सकाळी 11 वाजता (15 मिनिटं रोखणार)
लोणावळा रेल्वे स्टेशन : दुपारी 1 वाजता (भुसावळ एक्स्प्रेस 10 मिनिटं रोखणार)
जुना पुणे-मुंबई महामार्ग : तळेगाव आणि कान्हे फाटा येथे दिवसभरात कधीही रोखला जाईल
पिंपरी चिंचवड बंद
पिंपरी चिंचवड शहर बंद ठेवण्याचं आवाहन. वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहणार. हिंजवडीतील आयटी कंपन्या बंद ठेवण्याचा कंपन्यांचा निर्णय. काही कंपन्यांनी वर्क फॉर होमचा पर्याय अवलंबला आहे. तर ज्यांचं अतिशय महत्त्वाचं काम आहे, ते कर्मचारी सकाळी नऊ वाजण्याच्या आधी कंपनीत पोहचणार आणि सायंकाळी सहानंतर कंपनीतून बाहेर पडणार. हिंजवडीत एकूण 120 छोट्या-मोठ्या कंपन्या असून इथे साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. या सर्वांवर उद्याच्या बंदचा परिणाम होणार आहे.
'महाराष्ट्र बंद'साठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता
बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे
कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमतेची तोडफोड अथवा मोडतोड करु नये
मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे
पोलिस प्रशासनला सहकार्य करा
बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत
अफवांवर विश्वास ठेवू नका
मराठा सेवकांनी शांत राहून अॅक्शन प्लॅन तयार करायचा आहे
बंद असा करायचा की पुढच्या वर्षी फक्त क्रांती दिन नाही तर "मराठा क्रांती दिन" असं नमूद केलं पाहिजे