पुणे : पुण्यातील बाणेर, सुस, महाळुंगे या परिसरात राहणाऱ्या तब्बल पाच  हजार नागरिकांनी आपलं मत विकण्यासाठी काढलं आहे. परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. परिसरात विकास होताना दिसत आहे, मात्र येथील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.


या भागात मुलभूत सोयी-सुविधांचा वानवा आहे. रस्ते नाहीत, स्ट्रीट लाईट नाही, पाणी नाही की ड्रेनेजची सोय नाही. वाहनधारकांची तर अक्षरश: वाट लागते.


असुविधेबाबत नागरिकांनी पीएमआरडीए, महापालिका एवढच काय थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रार केली. मात्र एवढ्या तक्रारी करुनही त्याच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिलं नाही. अखेर आपल्या तक्रारींकडे लक्ष वेधण्यासाठी येथील नागरिकांनी पुणेरी शक्कल लढवली आणि तब्बल पाच हजार जणांनी थेट आपली मतं विक्रीस काढली.


लोकशाहीत आपल्या मताची मोठी किंमत आहे. मत विकणे म्हणजे आपला स्वाभिमान विकल्यासारखाच आहे. पण आपल्याला रस्ता, पाणी आणि वीज या मुलभूत गोष्टी मिळव्यात, अशी मतदारांची सरकारकडून अपेक्षा असते.


पुण्यातील हा परिसर तसा विकसनसील भाग समजला जातो. परिसरालगत हिंजवडी आयटी हब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी याच भागात पुण्याच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटनही केले होते. मात्र परिसरात मुलभूत सोई-सुविधांची बोंब आहे.


आपलं म्हणणं अनोख्या पद्धतीने मांडण्यासाठी पुणेकर जगप्रसिद्ध आहे. पुणेरी पाट्या तर सर्वश्रुत आहेत. आता या पाट्यांमध्ये  'मत विकणे आहे' या पोस्टरची भर पडली आहे. हे पोस्टर पाहून तरी परिसातील नागरिकांचे प्रश्न सुटणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.