पुणे : क्रांती दिनाचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांचा ठिय्या सुरु आहे.

मराठा आंदोलक आज सकाळी नऊ वाजताच गोविंदबागबाहेर जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. आंदोलकांच्या ठिय्यामुळे पवारांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घराबाहेर आले आणि ते देखील आंदोलकांसोबत घोषणाबाजी देऊ लागले. पवार कुटुंबीयांपैकी सध्या अजित पवारच गोविंदबागमध्ये आहेत.

दरम्यान, याआधी आठ वर्षांपूर्वी ऊस आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली होती. त्यानंतर आज पवारांच्या घराबाहेर ठिय्या देण्यात आला आहे.


कुठे कुठे इंटरनेट बंद?
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरु नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, औरंगाबाद इथली इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.

नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही
आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.

अनेक शाळांना सुट्टी
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक शाळांनी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टीचा निर्णय मुख्याध्यापकांकडे सोपवला होता. यानुसार काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतला आहे.
मात्र आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळं दूध आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

मराठा आंदोलकांच्या मागण्या
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.

आरक्षणासाठी आत्महत्या
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा 23 जुलैला गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर आज 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिनाचं औचित्य साधत, मराठा मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.