5 crore seized : पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या रकमेबाबत पोलीस अधिकारी, निवडणूक विभागाचे अधिकारी आणि इनकॅम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याचं पहायला मिळत आहे. कारण जप्त करण्यात आलेली रक्कम पाच कोटी रुपयांची माहिती मिळत असली तरी हे  पैसे कुणाचे होते, कुठुन आले होते आणि कुठे निघाले होते याची अधिकृत माहिती कोणत्याच अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही. 


गाडीचा नंबर MH 45 AS 2526 या गाडीतुन ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही गाडी आर.टीओकडील नोंदीनुसार अमोल नलावडे यांच्या मालकीची आहे. मात्र, अमोल नलावडे यांनी ही गाडी आपण बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकल्याचा दावा केला आहे. या रकमेसह गाडीमध्ये जे चार जण होते. त्यांना चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे आणि या रकमेचे तपशील इन्कम टॅक्स विभागाकडे जमा करण्यास सांगण्यात आला आहे. मात्र, पोलीस आणि निवडणूक विभागाचे अधिकारी याबाबत अधिकृतपणे माहिती का देत नाहीत हा प्रश्न विचारला जातो आहे. तर या प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


संजय राऊतांची प्रतिक्रिया


पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर गाडीत 5 कोटी पकडल्यानंतर आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीवर आरोप केले आहेत. राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर काल दोन गाडया पकडल्या. त्यात जवळपास 15 कोटी रुपये होते. मी बोललो होतो, एकनाथ शिंदे आपल्या माणसांना 50-50 कोटी पुन्हा देणार आहेत. 15 कोटीचा पहिला हप्ता जात होता. त्यात सांगोल्याचे गद्दार आमदार त्यांचे 15 कोटी जात होते. 5 कोटीचा हिशोब लागला. 10 कोटी सोडले. फोन आल्यावर एक गाडी सोडली. 5 कोटी आमच्या लोकांनी पकडून दिले. 150 आमदारांना 15-15 कोटी पोहोचले आहेत. उरलेले पैसे सुद्धा मिळतील”, असंही यावेळी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया


पैसे पकडलेली कार ही सांगोल्यातील असल्याने या पैशांचा संबध शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांशी जोडला जातो आहे. त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत, याबाबच एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना शहाजीबापू म्हणाले, त्या पैशाची अथवा गाडीशी माझा कसलाही संबंध नाही. संजय राऊत हे नेहमीच वाटेल ते बोलत असतात त्यांना झोपताना झाडी आणि उठताना डोंगर दिसतो. या गाडीत असणारे कार्यकर्ते हे माझ्या संबंधातली असले तरी त्यांचे व्यवसाय उद्योग वेगवेगळ्या आहेत आणि काल झालेल्या या प्रकारानंतर माझ कोणाचाही संपर्क झालेला नाही. ही गाडी सांगोल्याची असल्याने लगेच मला टार्गेट करायचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पैशाची अथवा गाडीशी माझा कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 


शहाजी बापुंनी काय झाडी काय डोंगार असा उल्लेख केलेला कार्यकर्ता देखील कारमध्ये


खेड शिवापुर टोलनाक्यावर जप्त करण्यात आलेली रक्कम ज्या गाडीमधे दडवण्यात आली होती, त्या गाडीमध्ये असलेल्या या चार व्यक्ती आहेत. या चार जणांची नावे खेड शिवापुर पोलीस चौकीच्या स्टेशन डायरीमधे नोंद करण्यात आली आहेत. यातील रफिक नदाफ हा तोच आहे. ज्याने शहाजीबापू पाटील गुहावटीला असताना फोन केला होता आणि त्याच्याशी बोलताना शहाजी बापुंनी काय झाडी काय डोंगार असा उल्लेख केला होता. तर यातील सागर पाटील हा शहाजी बापूंचा नातेवाईक आहे.


कारमध्ये असलेल्याची नावे


1) सागर पाटील-सांगोला
2) रफीक नदाफ-सांगोला 
3) बाळासाहेब असबे -सांगोला 
4) शशिकांत कोळी -ड्रायव्हर