पुणे : कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर आयसीयूमध्ये असून सध्या ते व्हेंटिलेटवर आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी विश्वजीत कदम आणि जहांगीर रुग्णालयाचे डॉक्टर गील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सातव यांची प्रकृती स्थिर असून गरज पडल्यास मुंबईत हलवण्याबाबत विचार करु असंही कदम यांनी सांगितलं.


पत्रकार परिषदेत विश्वजीत कदम म्हणाले की, "19 एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र 25 तारखेला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरची गरज लागली. सातव यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की ते यातून लवकर बाहेर येतील."






राजीव सातव यांची प्रकृती काल दुपारपर्यंत व्यवस्थित होती. परंतु अचानक तक्रारी वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती डॉक्टर गील यांनी दिली. तर सातव यांची प्रकृती स्थिर आहे, गरज पडल्यास मुंबईत हलवण्याबाबत विचार करु, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.


कोरोनाग्रस्त राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी लीलावतीमधील डॉक्टरांची टीम पुण्याला जाणार


दरम्यान सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आणि रुग्णालय प्रशासनावर ताण पडू नये, यासाठी  कोणीही गर्दी करु नये, फोनवरुनच तब्येतीची विचारपूस करावी, अशी विनंती कुटुंबीयांनी केल्याचं विश्वजीत कदम यांनी म्हटलं.


राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू नेते आहेत. सातव हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेतही त्यांचा विजय झाला होता. काँग्रेस आणि गांधी घराण्याची निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरातच्या काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदार आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमग्राऊंड आहे.