पुणे : पुणे शहरात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हॉटेल, बार, पब सुरु असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या अशा हॉटेलमध्ये हुक्का पार्टी रंगत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील आहेत. मात्र असे असतानाही स्थानिक पोलीस मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतं. परिणामी गुन्हे शाखेच्या पोलिसांना जाऊन कारवाई करावी लागते.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी (14 मे) रात्री पुणे शहरातील कोंढवा मुंढवा आणि येरवडा परिसरातील नामांकित हॉटेलवर कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल उघडे असल्याचे दिसून आले होते. या ठिकाणी हुक्का पार्टी देखील रंगल्या होत्या. तरुण-तरुणी नशेच्या अंमलाखाली याठिकाणी वावरत असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या निदर्शनास आले. परिणामी पोलिसांना त्यावर कारवाई करावी लागली.
यापूर्वी अनेकदा शहरातील नामवंत हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरु ठेवणे, हुक्का विक्री करणे असे प्रकार पुणे शहरातील हॉटेलमध्ये सातत्याने होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलीस मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात. गुन्हे शाखेला जे कळते ते स्थानिक पोलिसांना कळत नाही का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये हुक्का गोडाऊनवर छापा
मुंढवा पोलिसांनी येवलेवाडी परिसरातील एका हुक्का गोडाऊनवर छापा मारुन कारवाई केली होती. या ठिकाणाहून पोलिसांनी 22 लाख 17 हजार रुपये किंमतीचा हुक्का आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या ठिकाणाहून पोलिसांनी तिघांना अटक केली होती. शहेजाद अश्रफ रंगूनवाला (वय 37), नवेद मुंने खान (वय 21) आणि शरीफ मोहम्मद मालापुरी (वय 18) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2018 चे कलम 4 अ 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचारी येवलेवाडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. पोलीस नाईक तुषार आल्हाट यांना एका इमारतीच्या पार्किंगच्या जागेमध्ये हुक्क्याचे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करुन पोलिसांच्या एका पथकाने या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हुक्का तसेच हुक्क्याचे साहित्य आढळून आले.