Pune  Ganeshotsav News: पुण्यात गणेशोत्सव (Ganeshotsav News) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी (उद्या) दिवस दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात शांतता रहावी यासाठी हे आदेश काढण्यात आले आहे.


पुणेकरांच्या सुरक्षेसाठी आणि दोन वर्षांनंतर होणाऱ्या उत्सव लक्षात घेऊन उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शहरात दारु विक्री करण्यास मनाई केली आहे. दोन वर्षांनी यंदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. अनेक भाविक गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. मात्र शेवटच्या दिवशी भविकांची गर्दी दुपटीने वाढते. जय्यत मिरवणूका असतात. त्याच वेळी शांतता भंग होऊ नये आणि मिरवणुकीच्या जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दारूबंदी कायदा, 1949 च्या नियम 142 अन्वये आदेश जारी केले आहेत. त्यांनी याबाबत अधिकृत नोटीसही जारी केली आहे. याशिवाय गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गासह सर्व ठिकाणी दारूविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949आणि त्याखाली बनविलेल्या नियमांनुसार दंडनीय असेल.


तातडीने कारवाई होणार
विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात दारु विक्रीला बंदी करण्यात आली आहे. सगळ्या दारु विक्रेत्यांना या संदर्भातच्या सुचना देण्यात आल्या आहे. या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यभरात यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून देखील जय्यत तयारी केली होती.  पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि नियोजन सांगितले होते. त्यानुसार मागील 9 दिवस या उत्सवाला कोणतंही गालबोट लागलं नाही. विसर्जन मिरवणुकील गालबोट लागू नये यासाठी देखील पुणे पोलीस सज्ज आहेत.


8500 पोलीस तैनात 
यंदा विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात 8500 पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय शहरातील काही महत्वाचे रस्तेदेखील बंद ठेवण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ताया मार्गावरुन मिरवणूक जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.