Pune Rain Update : पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.  दुपारपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यातील पावसामुळे गणपती दर्शनाला आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील पाच मानाच्या आणि काही महत्वाच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे. अशातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्यांच्या दौऱ्यात विलंब होताना दिसत आहे. सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण होतं. मात्र दुपारपासून पुण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. लहान मोठ्या गणेश मंडळांना देखील पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

Continues below advertisement


गणेश मंडळांना देखील पावसाचा फटका
गणपती मंडळांना देखील या अचानक पडलेल्या पावसाचा फटका बसला आहे. भाविकांची देखील तारांबळ उडली आहे. मोठे गणेशमंडळांच्या देखाव्याचं थोड्याप्रमाणात नुकसान झालं आहे. दोन दिवस गणेशोत्सवाचे शिल्लक आहे. याच दिवशी भाविक मोठ्या संख्येने गणपतीचं दर्शन आणि विविध देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. या पडलेल्या पावसामुळे भाविकांनादेखील फटका बसल्याचं चित्र आहे.


पुण्यासह बारामती शहरात देखील जोरदार पाऊस पडत आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर आणि निंबुत भागात हा जोरदार पाऊस बरसला आहे. या पावसामुळं शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे. या पाण्यामुळं पिकं वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं नीरा-बारामती रस्त्यावरील पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं या रोडवरील वाहतुक ठप्प करण्यात आली आहे. नीरा-बारामती रस्त्यावरील फरांदेनगर येथील ओढ्यावर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला तेथील स्थानिक युवकांनी दोरीच्या साहाय्याने वाचवले आहे.


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. 


दरम्यान, राज्याच्या काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी मात्र, पावसाची गरज आहे. नांदेड जिल्ह्यात सुरुवातील पावसानं थैमान घातलं होतं. मात्र, तिथे गेल्या 20 ते 25 दिवसापासून पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळं तेथील शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहे. तेथील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.