Ladki Bahin Yojana program: पुण्यातील बालेवाडीत आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ होतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये हा कार्यक्रम होत आहे. जमलेल्या महिलांसाठी आधी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातल्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींचा भन्नाट डान्स कार्यक्रमस्थळी पाहायला मिळत आहे. 


कार्यक्रमाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे. त्या ठिकाणी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत गीत गात होते. त्या गीतावर जमलेल्या महिलांनी ठेका धरला. अनेक महिला कार्यक्रमस्थळी जागेवरती उभ्या राहून भन्नाट डान्स करत असल्याचं देखील यावेळी समोर आलं आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांनी हजेरी लावली आहे. 


लाडकी बहीण योजनेचा शुभारंभासाठी पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना उपस्थितीची सक्ती?


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) शुभारंभ आज पुण्यातील बालेवाडीत होणार आहे. यात किमान पंधरा हजार महिलांची हजेरी अपेक्षित आहे. हीच गर्दी वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना सक्ती करण्यात आलीये का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण आपण कुठं, कशासाठी आणि का चाललोय? याबाबत या महिला अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना गर्दी करण्याचं टार्गेट महायुती सरकारने दिल्याचं बोललं जातं आहे. यातूनच पिंपरी पालिकेने असा उपद्व्याप केल्याची चर्चा रंगलेली आहे.


कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित


आज पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत शुभारंभ करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित असणार आहेत.


कार्यक्रमासाठी 15 हजार महिला राहणार उपस्थित


राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी महिला कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, महिलांसाठी बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे.