पुणे : रशियात एकविसाव्या फिफा विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर चार वर्षांनी येणारी खेळांच्या दुनियेची जणू दिवाळी. जगभरात या खेळाचे चाहते आहेत. या खेळाच्या आवडीपायी लोक काय काय करतील याचा नेम नाही.

पुण्यातले श्रीनिवास भट आजोबाही फुटबॉलचे निस्सीम चाहते आहेत. फुटबॉलच्या वेडापायी त्यांनी आपल्या घरात लेपल पिनचे कलेक्शनच केले आहे. या लेपल पिनला फुटबॉल जगतात बराच मान आहे.

प्रत्येक संघाच्या लेपल पिन या वेगवेगळ्या असतात. आणि त्या त्या संघातील खेळाडू, त्यांचे पाठीराखे हे लेपल पिन आपल्या ब्लेझरवर अभिमानाने मिरवत असतात. भट आजोबा हे महिला हॉकी संघाचे काही काळ सदस्य देखील राहील आहेत.

अनेक देशाचे पंतप्रधान आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती हे लेपल पिन आपल्या ब्लेझरवर अभिमानाने लावत असतात. तर पुण्यातील या भट आजोबांना हे लेपल पिन जमा करण्याचा छंद लागला आहे.



1995 साली हे आजोबा फ्रान्समध्ये फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेले होते. तेव्हापासून त्यांना हे लेपल पिन जमा करण्याचा छंद लागला आहे.

बरं हे लेपल पिन सहजासहजी मिळतही नाहीत. त्यासाठी खिसा रिकामा करावा लागतो. परंतु असे असतानाही भट आजोबांच्या संग्रहात आतापर्यंत एक हजाराहून अधिक लेपल पिन जमा झाल्या आहेत.

भट आजोबांच्या घरात प्रवेश करताच हा लेपल पिनचा खजिना नजरेस पडतो. या लेपल पिनसाठी त्यांनी भिंतीत कपाट तयार केले असून यामध्ये मांडणी केली आहे. भट आजोबा फक्त फुटबॉलप्रेमीच नाहीत तर क्रिकेट, बास्केटबॉल, टेनीस या खेळाचे देखील निस्सीम चाहते आहेत. त्यांनी या खेळाच्या देखील अनेक लेपल पिन जमा केल्या आहेत. खेळाप्रती आवड असलेल्या भट आजोबांनी फिफा वर्ल्डकपमध्ये भारतीय संघानेही खेळावे अशी इच्छा व्यक्त केली.