मुंबई : पुण्यातील नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका खंडपीठानं नकार दिला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखवली.


दीपक मानकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी नकार दिला होता. मानकर यांच्या जामीन अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मात्र या याचिकेवर सुनावणी घेण्यास या खंडपीठाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे मानकर यांना दुसऱ्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करावी लागली होती. आता त्याही खंडपीठाने सुनावणीस नकार दिला आहे. मानकर यांना आता पुन्हा नव्या खंडपीठासमोर याचिका सादर करावी लागेल.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दिपक मानकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं.

या पाच जणांत दिपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू करताच मानकर यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली.

कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मानकरचं नाव

मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्ष दीपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पाहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समर्थ पोलिस स्टेशनसमोर असलेल्या जागेवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेकवेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जितेंद्र जगतापवर दबाव टाकत होते.

दरम्यान जितेंद्र जगताप हा खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी देत होता आणि त्याबद्दलचा अर्ज आपण 1 जूनलाच पोलिस आयुक्तालयात दिल्याचं म्हटलं आहे.

दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. काँग्रेसमध्ये असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. अनेक दिवस येरवडा कारागृहात जावं लागलं होतं.

संबंधित बातम्या :

पुण्यातील नगरसेवक दिपक मानकर अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात

जितेंद्र जगतापच्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकरांचं नाव

पुणे : जितेंद्र जगताप यांचा लहान भाऊ आणि मुलासोबत बातचीत