पुणे : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश इंदापूर न्यायालयानं दिला आहे. जमीन व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपावरुन हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे  आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए.शेख यांनी दिले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील एका शेतजमीनीच्या व्यवहारात दहा जणांनी फसवणूक केल्याच्या दावा इंदापूर न्यायालयात दाखल केला होता. त्या दाव्यावरुन न्यायालयाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत. मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी यासंदर्भात इंदापूरच्या न्यायालयात मागील वर्षी दावा दाखल केला होता.

कौटुंबिक वादातून जमिनीच्या तडजोडीचा हुकूमनामा झाल्यानंतर आपल्या वाट्याची जमीन फसवून विकण्यात आली, अशी तक्रार रणवरे यांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र इंदापूर पोलिसांनी तिची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. त्यावरून न्यायालयाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.