पुणे: रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीची अंतिम फेरी गाठणारी धावपटू ललिता बाबरनं पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला आज भेट दिली. तेव्हा ठिकठिकाणी तिचा जंगी सत्कार झाला.
अनेक शालेय विद्यार्थीही या सत्कारात उत्साहानं सहभागी झाले होते. ललितानं त्यांच्याशी संवाद साधला आणि मार्गदर्शनही केलं. 2020 साली जपानच्या टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचं आपलं ध्येय असल्याचं ललितानं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रात १०० ललिता तयार व्हाव्यात अशीही इछाही तिनं व्यक्त केली.
दरम्यान ललिता बाबरला नुकतंच यंदाच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ललिता मूळची साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या मोही गावची रहिवासी आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत दहावं स्थान मिळवलं होतं. त्याआधी 2014 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत तिनं रौप्यपदकाची कमाई केली होती आणि 2015च्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.