पुणे:  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला देखील अटक झाली. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज (23 मे) पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक  झाली. वैष्णवी हगवणे प्रकरणी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला होता. दरम्यान आज(शुक्रवारी) महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे.


करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार 


माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, वैष्णवीच्या आई-वडिलांकडे बाळ देण्यापूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दरम्यान 6 नोव्हेंबर 2024 रोजी वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणेने महिला आयोगाकडे तिला भावाचा आणि वहिनीचा त्रास होतो अशी तक्रार केली, त्याच दिवशी मयुरीच्या (मोठी सून) भावाने (मेघराज जगताप) ही महिला आयोगाकडे तक्रार केली. त्या तक्रारी पोलिसांकडे पाठविण्यात आल्या. त्यानुसार 7 नोव्हेंबरला बावधन पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. हा कौटुंबिक वाद होता, त्यामुळं समुपदेशन करुन हा वाद मिटविण्याचा हेतू होता. वैष्णवीच्या संदर्भात महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार नाही. पोलिसांनी या प्रकरणी उत्तम तपास केला आहे, बाळालाही वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सुखरुप सोपवलं आहे. आपल्याकडे कठोर कायदे आहेत, पण ते मोडले जातात. मग तो हुंडाबळीचा कायदा असो की गर्भलिंगनिदान चाचणीचा कायदा असो, यासाठी पळवाटा शोधल्या जातात, अशी माहिती रूपाली चाकणकरांनी दिली आहे.


संबंधित पोलीस स्टेशनला पत्र पाठवून कारवाई करण्यासाठी सूचना


करिष्मा हगवणे यांची भाऊ आणि भावजयबद्दलची तक्रार महिला आयोगाला पाठवलेली होती. त्याच दिवशी आमच्याकडे दुसरी तक्रार आली. ती तक्रार मेघराज जगताप यांची म्हणजे मयुरी हगवणे यांच्या भावाची होती. तक्रार केल्यानंतर आम्ही एकाच दिवशी दोन तक्रारी लागोपाठ आल्या, त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला पत्र पाठवून कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने सूचना दिल्या होत्या. तक्रारदारांना देखील पत्र पाठवलं आणि पोलिसांनाही पत्र पाठवलं आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीने निर्देश दिले होते. या प्रकरणात क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे पोलिसांनी त्यांना कौन्सिलिंग करून हा वाद मिटवावा, यासाठी प्रयत्न केले. अशा केसेसमध्ये पहिल्यांदा तीन समुपदेशन केले जातात, त्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून ही कौन्सिलिंग केली गेली अशी माहिती रूपाली चाकणकरांनी दिली आहे.


वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी...


मयुरी हगवणे प्रकरणात चार्ज शीट दाखल झालं नाही, हे गंभीर आहे. मी मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करणार आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पौड पोलीस स्टेशनचा भाग पुणे ग्रामीणमध्ये होता, आता तो भाग पिंपरी चिंचवड भागात आहे. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आऊट ऑफ वे जाऊन काम करणं ही आपली जबाबदारी आहे. वैयक्तिक टिकांची उत्तर मला ही देता येतात, पण माझ्यावर ते संस्कार नाहीत. विरोधकांना आमच्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते. मी सुमोटो दाखल केल्याची विरोधकांना कल्पना नसावी. महिला आयोग केवळ संबंधित विभागाला पाठवण्याचे ते काम आहे. त्यानुसार पोलिसांकडे तक्रार गेली आणि मग एफआयआर झाली. त्यापुढं तपास करायचं काम त्यांचं असतं. एक विभाग एकचं काम करु शकतो, असंही पुढे चाकणकरांनी म्हटलं आहे.