Pune Japanese Encephalitis : पुण्यात आता जपनी मेंदूज्वराचा (Pune) रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे. एका चार वर्षाच्या मुलाला या आजाराची बाधा झाली आहे. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे महापालिकेच्या क्षेत्रात पहिल्यांदाच या आजाराचा रुग्ण आढळला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी पलिकेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.
वडगाव शेरी परिसरातील चार वर्षाच्या मुलाला जॅपनीज एन्सेफलायटिस म्हणजेच जपानी मेंदूज्वर या आजाराचे निदान झाले आहे. हा विषाणूजन्य आजार आहे. या मुलाला तीन नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयातील बालरुग्ण अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डोकेदुखी, अशक्तपणा आणि फिट येणे ही लक्षणे दिसून येत होती. त्यानुसार रुग्णालयात विविध तपासण्या केल्या. तसेच नियमित उपचारही सुरु ठेवण्यात आले. मुलाच्या रक्ताचे तसेच मणक्यातील पाण्याचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवण्यात आले होते. या संस्थेने 29 नोव्हेंबर रोजी रुग्णाचा अहवाल ससूनला दिला. त्यामध्ये त्याला जपानी मेंदूज्वर असल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.
मुलाला सलग नऊ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यासोबत त्यास आवश्यक औषधेही चालू करण्यात आली. सतरा दिवसांच्या अतिदक्षता विभागातील उपचारानंतर मुलाला सर्वसाधारण वॉर्डमध्ये हलवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. हा आजार साधारणपणे 15 वर्षाखालील वयोगटातील मुलांमध्ये आढळून येतो.
क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासामुळे पसरतो
त्यामध्ये रुग्णाला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, फिट येणे अशी लक्षणे आढळून येतात. हा शहरातील पहिलाच रूग्ण असल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. जपानी मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार असून तो क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासामुळे पसरतो. पावसाळ्यात किवा पावसाळ्यानंतर या डासांचा प्रादुर्भाव वाढतो पण यापूर्वी हा डास पुण्यात आढळून आला नव्हता. त्यामुळे त्याचे रुग्णही सापडत नव्हते, असा दावा केला जात आहे.
क्वचितच माणासांमध्ये आढळतो...
पुण्यात पहिल्यांदाच जपानी मेंदूज्वराचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहेत. विविध उपाययोजनांसाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. हा आजार प्रामुख्याने प्रामुख्याने प्राण्यांमध्ये पसरणारा आजार आहे. या आजाराची बाधा क्वचितच माणसांमध्ये होतो. डुक्कर, तळ्याभोवती किंवा जनावराभोवती असलेल्या असलेल्या पक्ष्यांमध्ये विषाणूची वाढ होते, त्यामुळे पुणेकरांना मुलांची काळजी आणि डास असतील अशा परिसरापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.