पिंपरी चिंचवड : कचऱ्याचा प्रश्न सर्वच ठिकाणी त्रासदायक ठरणारा आहे. साचणारा हा कचरा कोणी साफ करायचा, यासाठी प्रत्येक जण एक-दुसऱ्याकडे बोट दाखवतो. प्रशासन पातळीवर यासाठी कचरा वेचक नेमले जातात, मात्र ते देखील नित्याने काम करत नाहीत. लोणावळ्यामध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र लोणावळा नगरपरिषदेनं यावर नामी शक्कल लढवली आहे.


 

टेकबिन... कचरा टाका, चॉकटेल मिळवा!

 

कचरा टाकल्यावर चॉकलेट मिळालं, तर…? आश्चर्य आहे ना? याआधी तुम्हाला मशीनमध्ये पैसे टाकल्यावर चॉकलेट, थंड पेय मिळाली असतील. पण या मशीन मध्ये तुम्हाला कचरा टाकल्यावर चॉकलेट मिळणार आहे. टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्स बिन अर्थात टेकबिन नावाची ही मशीन लोणावळा शहरात तुम्हाला जागोजागी दिसणार आहेत. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सध्या सुरू केला जातोय. एटीएम सारख्या दिसणाऱ्या या मशीनची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला एटीएम कार्ड नव्हे तर कचरा टाकायचा आहे आणि तुम्हाला यातून पैसे मिळणार नसले तरी चॉकलेट मात्र नक्की मिळणार आहे. लोणावळा नगर परिषदेनं मुंबईच्या एशियन गॅलट या कंपनीच्या मदतीने हा अनोखा उपक्रम सुरू झालाय.

 

नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे. घरातील बच्चे कंपनीला चॉकलेटसाठी पैसा खर्च करण्यापेक्षा कचऱ्याच्या बदल्यात चॉकलेट मिळत असल्याने नागरिक थेट या मशीनमध्ये टाकण्याची तयारी दर्शवली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली खरी, मात्र हा उपक्रम भाजपाचा असल्याने विरोधक या मोहिमेपासून चार हात लांबच राहतात. खरं तर स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी येतो तेव्हा आपला परिसर स्वच्छ ठेवल्यानंतर मोदींचे नव्हे तर स्वतःचे आरोग्य सुदृढ राहणार ही बाब सर्वानी लक्षात घ्यायला हवी आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष असणाऱ्या लोणावळा नगरपरिषद आणि नागरिकांनी प्रायोगिक तत्वावर राबविणार आहेत. याचा आदर्श भाजपा सह इतरांनी देखील घ्यावा. तेव्हाच हा देश स्वछ भारत होईल.