Pune Yerwada Jail News : येरवडा मध्यवर्ती ( Yerwada Jail) कारागृहात कैद्यांच्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी (19 जून) पुन्हा कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या हाणामारीत 16 कैदी जखमी झाले. सोमवारी सकाळी 10 ते 10:30 च्या सुमारास किरकोळ वादातून हाणामारी झाली. या प्रकरणी हा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींवर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये धोकादायक शस्त्रे वापरुन हानी पोहोचवणे, बेकायदेशीर असेंब्लीमध्ये भाग घेणे यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. येरवडा येथील अधिकारी हेमंत इंगोले यांनी या घटनेची अधिकृत तक्रार दाखल केली. तीन कैद्यांच्या डोक्याला जखमा झाल्या असून त्यांना टाके घालावे लागले आहेत तर इतरांना त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि खांद्यावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. हाणामारीत दहा ते सोळा कैद्यांचा समावेश आहे. ही घटना 19 जून रोजी बॅरेक क्रमांक 8 मध्ये घडली. या प्रकरणानंतर कारागृहाच्या सुरक्षेविषयी प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे.
प्रकाश शांताराम येवले, विजय चंद्रकांत विरकर, सचिन शंकर दळवी, मुकेश सुनिल साळुंखे, गणेश वाघमारे, आदित्य नानाजी चौधरी, किरण रमेश गालफाडे, आकाश उत्तम शिनगारे, विशाल रामधन खरात, रुपेश प्रकाश आखाडे, रोहित चंद्रकांत जुजगर, शुभम गणपती राठोड, अनुराग परशुराम कांबळे, मेहबुब फरिद शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. जुने कैदी आणि नवीन कैद्यी यांच्यात हा राडा झाला होता. दगडफेक सुरु असताना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदाराला कैद्याच्या जमावाने मारहाण देखील केली होती. त्यामुळे येरवडा कारागृहात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच कैद्यांवर कारवाई केली होती. समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावं होती.
जागा कमी अन् कैदींची संख्या दुप्पट
येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता सध्या 2 हजार 526 इतकी आहे. मात्र त्या ठिकाणी सध्या 6 हजार 484 कैदी ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ कारागृहात दुप्पट संख्येने कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे झोपण्याच्या जागेपासून आंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात वादावादी होत असतात.
संबंधित बातमी-