पुणे : पुण्यात ड्रग्स तस्करी आणि गांजा तस्करीचं प्रमाण वाढत असतानाच (Pune crime news) आता पुन्हा एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर पुणे एक्स्प्रेसमधून तब्बल 120 किलो गांजा जप्त केला आहे. पुणे कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे. या गांजाची किंमत साधारण 48 लाख रुपये आहे. 


पुण्याकडे जाणाऱ्या भुवनेश्वर पुणे एक्स्प्रेसमधून मोठ्या प्रमाणात गांजा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. संशयित व्यक्ती सोलापूर रेल्वे स्थानकावर गाडीतून उतरणार होत्या आणि त्यानुसार नार्कोटिक्स सेल, पुणे कस्टमच्या अधिकाऱ्यांचे पथक सोलापूर रेल्वे स्थानकावर पाळत ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते. पाळत ठेवताना तीन संशयित व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. या तिघांच्या सामानाची कसून तपासणी केली असता 120 किलो गांजा आढळून आला. 


या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी जबाबात गांजा बाळगणे आणि अवैध तस्करी केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार 120 किलो वजनाचा 48 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींना एनडीपीएस अधिनियम, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आण न्यायालयीन कोठडी सुनावली आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार कुणाल डोरा (रा. ओडिशा) हा एक आरोपी आहे. त्याचा तपास पोलीस करत आहे.


काही दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडमध्ये रुग्णवाहिकेचा वापर करून गांजाची तस्करी केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला होता. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एक कोटी 31 लाखांचा 96 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला होता. कृष्णा शिंदे, अक्षय मोरे, हनुमंत कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे, सन्नीदेवल शर्मा, सन्नीदेवल भारती आणि सौरभ निर्मलला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.


तस्करांवर कस्टम विभागाची करडी नजर


सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि गांजाची तस्करी होत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. त्यात आतापर्यंत लाखो रुपयांचा गांजा पुणे शहरात जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस,रेल्वे पोलीस आणि कस्टम या विभागांची तस्करांवर करडी नजर असल्याचं कारवायांमधून दिसून येत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune News : शौक नडला! बिबट्याच्या नखाचं लॉकेट करण्यासाठी थेट बिबट्याचा पंजा कापला; तिघांवर गुन्हा दाखल