Indrayani River Flood: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. मंदिराकडे जाणारा भक्ती-सोपान पूल आणि दर्शन बारीचा पूल पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढतच चालला आहे, ती पात्र सोडून वाहू लागली आहे. पुढचा संभाव्य धोका पाहता जुना पूल आणि इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
आळंदी शहरात इंद्रायणी नदीला पूर आल्याने, जुना पूल आणि घाट सध्या बंद करण्यात आले आहेत. पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हे दोन्ही बंद केले आहेत. इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे, नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी दुथडी भरून वाहत असून, पुराचे पाणी घाटावर आणि मंदिराच्या परिसरात शिरले आहे. त्यामुळे, नदीच्या परिसरात नागरिकांनी तसेच भाविकांनी जाणे सध्या धोकादायक आहे.
पिंपरी चिंचवडमधील केजुबाई मंदिर ही पाण्याखाली
पिंपरी चिंचवड मधील केजुबाई मंदिर पाण्याखाली गेलं आहे. पवना नदी लगत हे मंदिर वसलेलं आहे. हीचं पवना नदी पात्र सोडून वाहू लागली आहे, केजुबाईचा बंधारा ओसंडून वाहतोय. परिणामी केजुबाईच्या मंदिराला पाण्यानं वेढलं आहे. पवना धरणातून 15 हजार 700 मिलिमीटर पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरु असल्यानं ही परिस्थिती उद्भवलेली आहे.
पवना माईचं पाणी मोरया गणरायाच्या भेटीला
पिंपरी चिंचवड मधून वाहणारी पवना माई पात्र सोडून वाहते आहे. यानिमित्ताने या पवना माईचं पाणी चिंचवडचं ग्रामदैवत मोरया गणपतीच्या भेटीला आलेलं आहे. पवना धरण क्षेत्र, मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवड शहरावर वरुणराजाने कृपा दृष्टी दाखवलेली आहे. परिणामी पवना माई आणि मोरया गणपतीच्या भेटीचा योग पुन्हा एकदा जुळून आला आहे.