पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून काही रस्ते उखडलेही आहेत.
लोणावळ्यात विक्रमी पाऊस
पर्यटननगरी लोणावळ्यात पावसाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मागील २४ तासांत तब्बल ४३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. काल दहा तासांत १५० मिमी पाऊस झाल्यानंतर पुढच्या १४ तासांत आणखी २८२ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात लोणावळ्यात आतापर्यंत ४८१० मिमी पाऊस झाला आहे.
धरणांतून विसर्ग वाढवला
पावसामुळे धरणसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सकाळी ९ वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग ३५ हजार क्युसेकवरून ३९ हजार क्युसेक करण्यात आला आहे.याशिवाय,पानशेत व वरसगाव धरणातून प्रत्येकी १२ हजार क्युसेक,टेमघर धरणातून २ हजार क्युसेक विसर्ग सोडला जात आहे.
धरणातील पाणीसाठ्याची स्थिती
* खडकवासला : ८६.९९ %* टेमघर : १०० %* वरसगाव : ९७.९७ %* पानशेत : ९८.२४ %
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
डेक्कन परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने नदीपात्रातील रस्ते दोन दिवसांपासून बंद आहेत. घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाखळीत पाण्याची आवक वाढतच आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना आणि वस्त्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एकता नगर भागातील नागरिकांना बाहेर येण्याचं आवाहन
एकता नगर भागातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. गाड्या बाहेर काढण्याचा आणि लोकांना बाहेर येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या भागात अनाउंसमेंट देखील सुरु आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमध्ये काही सोसायट्यांच्या पार्किंग रात्री पासून पाणी शिरलं आहे. महापालिकेकडून नागरिकांना खाली येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिक खाली येत नसल्याचं महापालिकेचे कर्मचारी सांगत आहेत आता खडकवासला धरणातून सकाळी ९ वाजता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. ३५ हजार क्युसेकवरून ३९ हजार करण्यात येणार आहे. त्यामुळे इथे पाणी वाढण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी रात्री पासून तैनात करण्यात आले आहेत.
पवना माईचं पाणी मोरया गणरायाच्या भेटीला
पिंपरी चिंचवड मधून वाहणारी पवना माई पात्र सोडून वाहतेय. यानिमित्ताने या पवना माईचं पाणी चिंचवडचं ग्रामदैवत मोरया गणपतीच्या भेटीला आलेलं आहे. पवना धरण क्षेत्र, मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवड शहरावर वरुणराजाने कृपा दृष्टी दाखवलेली आहे. परिणामी पवना माई आणि मोरया गणपतीच्या भेटीचा योग पुन्हा एकदा जुळून आलाय.