मावळ : मावळ तालुक्यातील कुंडमळा (Kundmala bridge collapse) येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल काल (रविवारी, 16 जून) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावर उभे असलेले अनेक पर्यटक नदीत कोसळून वाहून गेले. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 52 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. यामध्ये 51 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा आता एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तो पूल पडताना दिसत आहे, यावेळी त्या पूलावरती मोठ्या प्रमाणावर लोक असल्याचे दिसून येत आहे. अनेक लोक एकाच वेळी  या पुलावरती आल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आत्तापर्यंत त्या पुलावर किती लोक होते त्याचा आकडा समोर आला नव्हता, मात्र, आताचा हा फोटो पाहून आपण अंदाज लावू शकतो, त्या ठिकाणी किती गर्दी होती. 

Continues below advertisement


काल (रविवारी, ता,15) दुपारी तीन, साडेतील वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. या दुर्घटनेवेळी किती त्या पुलावरती किती लोक होते त्याचा आकडा निश्चित होत नव्हता. हे सगळं शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आता समोर आलेल्या फोटोवरून हे दिसतंय की दुर्घटनेवेळी पुलावरती खचाखच लोक भरलेले होते. या पुलावरील लोकांना पुढे मागे सरकण्यासाठी देखील जागा नव्हती. पुलावरती पाय ठेवायला देखील जागा नव्हती. जखमी झालेले नागरिक देखील हे सांगत होते, मात्र, ती भीषणता आता या फोटोवरून दिसून येत आहे. या पुलावरील फोटोमध्ये दिसून येत आहे, एकाही पर्यटकाला तेथून मागे पुढे हलण्याचीही जागा नव्हती. 


सुट्टीचा दिवस असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी


रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. 100 ते 150 पर्यटक पुलावर उभे होते. त्याचवेळी पूल मधोमध तुटून कोसळला, आणि अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आरडाओरडा, घबराटीचे वातावरण निर्माण झाले. काही स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उड्या टाकून काही पर्यटकांचे प्राण वाचवले. तत्काळ तळेगाव पोलीस, अग्निशमन दल, वन विभाग, बचाव पथके व स्वयंसेवी संस्था घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदतकार्य सुरू केले. घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती.


कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित होतात?


- इंद्रायणी नदीवरचा पूल कमकुवत झाल्यानं त्यावरून ये-जा करण्यास मनाई होती, मग पर्यटक पुलावर कसे काय चढले?
- पर्यटकांनी पुलावर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कोणाला जबाबदारी दिली होती? अन ते रविवारी कुठं होते?
- हा पूल दीड वर्षांपूर्वी वापरासाठी बंद केला होता, तर तेंव्हापासून पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही?
- गेल्या दीड वर्षात नवा पूल उभारायला सुरुवात का झाली नाही?
- आता 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा आहे, पण गेली दीड वर्ष ही दिरंगाई कोणामुळं?


इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूलचं वैशिष्ट्य काय?


- 1990 साली पुलाचे काम सुरु झालं
- 1993 साली हे पूल तयार झालं, तेव्हापासून वापरात
- 2023 साली म्हणजे 30 वर्षानंतर हा पूल जीर्ण झाल्याचं निदर्शनास
- दीड वर्षांपासून हा कमकुवत पूल वापरास बंद
- नव्या पूल उभारणीसाठी 8 कोटींचा निधी
- सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढून वर्क ऑर्डर ही दिल्याचा प्रशासनाचा दावा
- प्रत्यक्षात कामाला पावसानंतर सुरुवात होण्याची शक्यता