आता पोलिसांच्या खांद्यावर इंडिकेटर दिसणार
एबीपी माझा वेब टीम | 18 Jul 2019 11:48 PM (IST)
पोलिसांच्या खांद्यावर आता लाईट इंडिकेटर पाहायला मिळणार आहेत. लोणावळ्यातील नागरिकांना आज त्याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले आहे.
पुणे : पोलिसांच्या खांद्यावर आता लाईट इंडिकेटर पाहायला मिळणार आहेत. लोणावळ्यातील नागरिकांना आज त्याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले आहे. खांद्यावर इंडिकेटर लावून पोलिसांना याचा फायदा होतो की तोटा याचा अनुभव घेण्याचा हा प्रयत्न होता. खांद्यावर असे इंडिकेटर असलेले पोलीस दिसल्यास, चौकात किंवा रस्त्याकडेला पोलीस उभे आहेत, हे वाहनचालकांच्या लक्षात येईल. त्यामुळे पोलिसांना पाहून वाहनचालक गाडीचा वेग कमी करतील. अतिवृष्टी होणाऱ्या आणि दाट धुकं पडणाऱ्या परिसरात वाहनचालकांना समोरच्या व्यक्ती दिसत नाहीत. अशा परिस्थिती वाहतुकीवर नियंत्रण मिळवणाऱ्या पोलिसांची सुरक्षा धोक्यात येते. नजरचुकीने वाहनचालक कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला धडक देऊ शकतात. अशा वेळी हे इंडिकेटर पोलिसांना सुरक्षा देतील. कोणत्याही ठिकाणी रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या कामात हे इंडिकेटर महत्त्वाची भूमिका बजाऊ शकतात. गुजरातमध्येही प्रायोगिक तत्वावर अशी प्रात्यक्षिके घेतल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. रात्रीच्या वेळी लखलखणारे इंडिकेटर वाहनचालकांच्या मनात कारवाईची धडकी भरवत आहेत. रात्रीच्या वेळी अंधारात हे इंडिकेटर टॉर्चचे काम करतील. परंतु पोलिसांच्या खांद्यावर असणाऱ्या बॅचमुळे हे कितपत शक्य होईल, हादेखील प्रश्न आहे.