चाकण हिंसाचारप्रकरणी कारवाई पारदर्शक व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केली. गेल्या वर्षी 30 जुलैला झालेल्या मराठा मोर्चाने अचानक हिंसक वळण घेतलं होतं. यात वाहनांची जाळपोळ, दगडफेक, पोलीस स्टेशनवरही हल्ला झाला होता.
याप्रकरणी आत्तापर्यंत दोन हजार आंदोलकांची चौकशी झाली. त्यापैकी पोलीस स्टेशनवर हल्ला करणाऱ्या 108 आंदोलकांना अटक झाली, तर आणखी काहींना कधीही अटक होऊ शकते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा समावेश असू शकतो. चाकण हिंसाचाराच्या चौकशीत दिलीप मोहिते पाटलांचं नाव चौकशीत आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मोहितेंवर चाकण पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचा संशय आहे. पण कोणाला लक्ष्य न करता, ही कारवाई पारदर्शक व्हावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.
चाकणमध्ये काय घडलं होतं?
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मागील वर्षी 30 जुलै रोजी गालबोट लागलं. चाकण बंद दरम्यान मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तसंच काही ठिकाणी पोलिसांवरही हल्ले करण्यात आले होते.
चाकण कोणी पेटवलं?
चाकणमध्ये मराठा मोर्चाच्यावेळी झालेल्या हिंसक आंदोलनात मागील वर्षी 30 जुलै रोजी आंदोलकांनी पंचवीस ते तीस बसेस जाळल्या. तसंच अनेक वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
चाकण, देवाची आळंदी आणि खेडमध्ये बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरून जाणाऱ्या अनेक गाड्या यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. नाशिक, औरंगाबाद, मुंबई, अहमदनगर सोलापूर, कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या.