Pune Bhidewada first girls School reopen : भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्यात पुन्हा एकदा वर्ग भरणार आहेत. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भिडे वाड्यात 1848 साली शाळा सुरू केली होती. सध्या या ऐतिहासिक वास्तूची दूरवस्था झाली आहे. आता याच वास्तूत पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, ज्येष्ठ अभ्यासक हरि नरके, अधिकारी उपस्थित होते. 


बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी सांगितले की,  भिडे वाड्यामध्ये स्मारक उभारण्याबाबत चर्चा झाली. या वाड्याच्या तळ मजल्यावर सध्या दुकाने आहेत. सध्या ही जागा एका बँकेच्या ताब्यात आहे.  बँक आणि मूळ मालक यांच्यामध्ये सध्या न्यायालयात वाद सुरू आहे.  बँकेचे अधिकारी आणि मूळ मालक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल आणि न्यायालयातील वाद संपेल अशी अपेक्षा आहे. भिडे वाड्यात पुन्हा मुलींची शाळा सुरु करण्यात येईल.  ही शाळा महापालिकेकडून चालवण्यात येणार आहे. जवळपास आठ हजार चौरस फूट जागा शाळेसाठी उपलब्ध होईल. याच जागेवर मुलींची शाळा सुरु करणे हीच सावित्रीबाईना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. 


पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा 


तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाईंचा पुतळा बसवण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या नावे असलेल्या विद्यापीठात त्यांचाच पुतळा नाही ही बाब समोर आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 


ऐतिहासिक भिडे वाडा


पुण्यातील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली होती. हा वाडा पुण्यातील जुन्या वाडा संस्कृतीतील अनेक पारंपरिक घरांपैकी एक आहे. मुलींसाठी शाळा सुरू करणे ही त्याकाळी झालेली एक मोठा सामजिक क्रांतीच होती. महात्मा फुले यांच्याकडून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाई फुले या त्या शाळेतील शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका झाल्या होत्या. स्त्री शिक्षणाच्या या चळवळीत सावित्रीबाई यांना फातिमा शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. फातिमा शेख या 19 व्या शतकातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका असल्याचे म्हटले जाते.