पुणे :  बसमधील प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या हरियाणा राज्यातील टोळीस इंदापूर पोलिसांनी (Indapur Police)  जेरबंद केलं आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले 14 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. एक महिला धाराशिव ते पुणे (Dharashiv - Pune) या बस मधून नातेवाईकांच्या लग्नासाठी डाळज येथील घरी गेल्या होत्या. फिर्यादी यांनी इंदापूर पोलीस ठाणे येथे येऊन कुर्डवाडी ते डाळज बस मधून प्रवास करत असताना कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांचे 14 तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. 


गुन्हा नोंद झाल्यानंतर  तात्काळ इंदापूर पोलिसांनी पथक तयार केलं. गुन्हे शोध पथकाने इंदापूर, टेंभुर्णी, कुर्डवाडी, चाकूर शहरापर्यंतचे 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून चाकुर रेल्वे स्टेशन येथून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या हरियाणा राज्यातील टोळीला ताब्यात घेतले. सतिश कुमार मनपुरसिंग, राहुल धमेंद्र, सुभाष फुलला, शिशपाल पुरिराम, राजेशकुमार पुर्ण सिंह, विरेद्रकुमार रामस् वरूप आरोपीची नावे आहेत. आरोपींकडून चोरलेल्या सोन्याच्या बांगडया, आंगठी, नेकलेस, गंठण, ठुशी असे 14 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केलेले आहेत.


आरोपी हे सराईत गुन्हेगार


 सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी या पूर्वी पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यामध्ये रेल्वे व बस मधील प्रवास करणा-या प्रवाशाचे दागिने, किमंती वस्तू, रोख रक्कमेची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या चोरांकडून आणखी गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.


शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक


शेअर बाजारातील गुंतवणुकीवर झटपट पैसे कमावून श्रीमंत होण्याची स्वप्ने अनेकजण पाहतात. लोकांच्या याच मानसिकतेचा गैरफायदा घेत फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतात.  अशाच एका घटनेतील आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. डोंबिवलीतील अनेकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला पुण्यात सापळा रचून अटक करण्यात आली.  डोंबिवली मध्ये शेअर मार्केटमध्ये  गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 10 टक्के फायदा देण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. आरोपीने 150 हून अधिक लोकांना 4 कोटी 60 लाख रुपयाचा चुना लावणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विनय वरटी असे या आरोपीचे नाव असून शेअर मार्केटिंग साठी त्याने डोंबिवलीत शेअर मार्केटिंग चे कार्यालय सुरू केले होते. जवळपास 150 हून अधिक नागरिकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले.