India vs South Africa : रोहित शर्माच्या भारतीय संघानं केपटाऊन कसोटी (IND vs SA) सामन्यात सात विकेट्सनी सनसनाटी विजय साजरा केला. भारतानं या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत भारताने अनेक विक्रमांना गवसणी घातली. पण त्यासोबतच भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत म्हणजेच WTC गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचलाय. गुणतालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकासह न्यूझीलंडसह पाकिस्तानला पछाडत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर WTC गुणतालिकेत भारताची घसरण झाली होती. आता भारताने हिशोब चुकता तर केलाच त्याशिवाय अव्वल स्थानही काबिज केलेय.  


भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला फटका बसला आहे. WTC गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.  आफ्रिकेचा विजयाची टक्केवारी घसरली आहे. भारताविरोधात पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवत त्यांनी पकक मजबूत केली होती. पण दुसऱ्या सामन्यात माणहाणीकारक पराभव झाल्यामुळे घसरण झाली. भारतीय संघ 54.16 विनिंग पर्सेंटसह पहिल्या स्थानावर आहे. आफ्रिकेची विनिंग पर्सेंट 50 इतकी आहे. टीम इंडियाने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये एका सामन्यात पराभव, एक अनिर्णित आणि दोन सामन्यात विजय मिळवलाय. बारताकडे एकूण 26 गुण आहेत. 


 WTC गुणतालिका पाहिल्यास भारतानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांची विनिंग पर्सेंट समान आहे. दोघांचीही विजयाची टक्केवारी 50 इतकी आहे. न्यूझीलंडने दोन सामने खेळले आहेत, त्यामध्ये एक विजय आणि एक पराभव स्विकारला आहे. ऑस्ट्रेलियाने सात कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये चार विजय मिळवलेत तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याशिवाय एक सामना अनिर्णय सुटलाय. बांगलादेशचा संघ पाचव्या तर पाकिस्तानचा संघ सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघाने चार सामन्यात दोन विजय मिळवलेत, तर दोन पराभवाचा सामना केलाय. बांगलादेशने एक विजय आणि एक पराभव स्विकारला आहे.  इंग्लंडचा संघ आठव्या क्रमांकावर आहे, इंग्लंडने पाच सामन्यात दोन जिंकलेत, तर दोन गमावले आहेत.  श्रीलंका संघ अखेरच्या स्थानावर आहे, त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. लंकेनं दोन्ही सामने गमावले आहेत. 






भारताचा केपटाऊनमध्ये ऐतिहासिक विजय - 


रोहित शर्माच्या भारतीय संघानं केपटाऊन कसोटी सामन्यात सात विकेट्सनी सनसनाटी विजय साजरा केला. भारतानं या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विशेष उल्लेख करायचा तर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधली ही कसोटी जेमतेम पाच सत्रांमधल्या केवळ ६४२ चेंडूंमध्ये निकाली ठरली. त्यामुळं आजवरच्या इतिहासात ती सर्वात कमी चेंडूंमध्ये निकाली ठरलेली कसोटी ठरली. १९३२ साली ऑस्ट्रेलियानं मेलबर्न कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि ७२ धावांनी धुव्वा उडवला होता. त्यावेळी ती कसोटी केवळ ६५६ चेंडूंमध्ये निकाली ठरली होती. दरम्यान, केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव तीन बाद ६२ धावांवरून १७६ धावांत आटोपला. त्यामुळं भारतासमोर विजयासाठी केवळ ७९ धावांचं लक्ष्य होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या जोडीनं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी, भारताच्या जसप्रीत बुमरानं ६१ धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.