Pune Navale Bridge Accident : पुण्यातील (Pune) नवले पुल (Navale Bridge Accident)  परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांना महामार्गाची चुकलेली रचना कारणीभूत आहे, असं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी मान्य केलं आहे. या पुलावरील तीव्र उतार आहे. या उतारामुळे आतापर्यंतचे अनेक अपघात झाले. यात अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. उतार कमी करण्यासाठी शिफारस करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरी पुल ते धायरी पुल यादरम्यान ग्रेड चार पद्धतीचा असलेला उतार उड्डाणपूल आणि इतर मार्गांनी ग्रेड तीन पर्यंत आणण्यात येईल. त्यामुळे हा तीव्र कमी होईल आणि परिणामी अपघाताचं सत्र देखील कमी होईल, असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे. 


एका रात्रीत तीन अपघात


पुणे-बंगलोर हायवेवर नवले पुलावर रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकने एकाच वेळी 24 वाहनांना धडक दिली. यात 13 लोक जखमी झाले आहेत. त्याच रस्त्यावर एकाच रात्रीत तीन अपघात झाले. यात दोन सहा जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला. नवले ब्रिजवरील भीषण अपघातानंतर स्वामी नारायण मंदिराजवळ दुसरा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोने सात वाहनांना उडवलं. तर कात्रज रस्त्यावर तिसरा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नवले पुलाजवळ रात्रभरात एकूण तीन अपघात झाले.


पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर


पुण्यातील नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या अपघातात एका ट्रकने 24 वाहनांना धडक देऊन या वाहनांचं मोठं नुकसान केलं. या अपघाताचं कारण आता समोर आलं आहे. या ट्रकचे ब्रेक फेल झाले नव्हते तर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला आहे. ट्रकचालकाने उतारावर इंधन वाचवण्यासाठी न्यूट्रल केला होता. त्यामुळे ब्रेक लागला नाही. ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि  गाड्या चिरडल्या गेल्या. अपघातानंतर ट्रकचा चालक मणीराम यादव हा पळून गेला होता. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे, असं पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितलं आहे. 


नवले पुलाने आतापर्यंत घेतला 60 जणांचा जीव
पुण्यातील नवले पुलावर रोज शेकडो वाहनांची ये-जा करतात. या पुलावर तीव्र उतार आहे. त्यामुळे अनेक लोक या उतारामुळे अपघाताला बळी पडतात. आतापर्यंत या पुलावर अनेक अपघात झाले. त्यात सुमारे  60 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातासाठी पुलाला दोषी ठरवण्यात येत होतं. पुलाच्या रचनेसाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणालादेखील दोषी ठरवण्यात येत होतं. त्यांच्यावर आरोपदेखील करण्यात येत होते. मात्र त्यांनी आता अपघातासाठी महामार्गाची चुकलेली रचना कारणीभूत असल्यातं मान्य केलं आहे.