पुणे: निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात घडामोडींना वेग आला आहे. काल (सोमवारी) पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपये पकडले. तर आज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सासरी आयकर विभागाचे (Income Tax) छापे पडल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या सासरी म्हणजेच चंद्रकांत कटके यांच्या घरी आयकर विभागाचे (Income Tax) छापे पडले आहे. सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे (Income Tax) अधिकारी त्यांच्या घराची झाडाझडती घेत आहेत.  


चंद्रकांत कटके त्यांच्या वाघोली येथील घरात अधिकारी पोहोचले आहेत. महाराष्ट्राचा हिंदकेसरी असलेला पैलवान अभिजीत कटके हा अमोल बालवडकर यांचा मेहुणा आहे. तर कोथरूड मधून विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेले  भाजपचे नेते अमोल बालवडकर यांना मनवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट बालवडकर यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली होती. मात्र, ते ऐकत नसल्याने ही आयकर विभागाने (Income Tax) छापा टाकल्याची चर्चा रंगल्या आहे. 


अभिजीत कटके हे भाजपचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सख्खे मेहुणे


डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी अभिजीत कटकेंच्या पुण्यातील घरी आयकर विभागाने (Income Tax) छापा टाकला आहे. अभिजीत कटके हे भाजपचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सख्खे मेहुणे आहेत. अमोल बालवडकर हे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातुन येणारी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांचीच उमेदवारी या मतदारसंघातुन जाहीर केली आहे. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी देखील अमोल बालवडकर यांना माघार घेण्याची सुचना  केली होती . मात्र अमोल बालवडकर यांनी ते येणारी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप जाहीर केलेले नाही. त्याआधी पडलेल्या या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे. 


हिंदकेसरी अभिजीत कटके कोण आहे?


अभिजीतने यापूर्वी एकवेळा महाराष्ट्र केसरी तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजीत कटके पुण्यातील शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. अभिजीतने 2015 मध्ये युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. अभिजीतने 2016 मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.