पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात आता पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण उद्या म्हणजेच 1 जुलैपासून शहरात पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. 13 प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांखाली अशी एकूण 450 'पे ऍण्ड पार्क'ची ठिकाण निवडण्यात आली आहेत. नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यास वाहतूक पोलीस 200 रुपयांचा दंड आकारणार आहेत.


पिंपरी चिंचवड शहरात 'पे ऍण्ड पार्क' पॉलिसी राबवावी की नाही याबाबत गेली अनेक वर्षांपासून अनेकदा चर्चा झाली. यातून मतमतांतरही समोर आली. पालिकेच्या सर्व साधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत रणकंदनही पाहायला मिळालं. पण त्यानंतरही 'पे ऍण्ड पार्क'ची पॉलिसी राबवण्याला सत्ताधारी भाजपने मंजुरी दिली आहे. शहरात अवजड वाहनं नको तिथं पार्क केली जातात. यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीचं चित्र निर्माण होतं. त्यामुळे अशा बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून 'पे ऍण्ड पार्क' पॉलिसी असणं गरजेचं आहे. म्हणूनच याला मंजुरी देण्यात आल्याचं सभागृह नेते नामदेव ढाकेंनी सांगितलं. मात्र याद्वारे सत्ताधारी शहरवासीयांची पिळवणूक करतायेत. पैशांची लूट करण्यासाठीचं हे भाजपची पॉलिसी आहे, असा आरोप करत विरोधी पक्षनेते राजू मिसाळांनी याला विरोध दर्शविला आहे. 


पे ऍण्ड पार्क चे दर (प्रति तास)  



  • दुचाकी आणि तीन चाकी - 5 रुपये

  • चारचाकी - 10 रुपये

  • टेम्पो आणि मिनी बस - 25 रुपये 

  • ट्रक आणि खाजगी बस - 100 रुपये


या मार्गावर असतील 'पे ऍण्ड पार्क'ची ठिकाणं



  1. टेल्को रोड 

  2. स्पाईन रोड

  3. नाशिक फाटा वाकड बीआरटीएस रस्ता

  4. जुना मुंबई-पुणे रस्ता 

  5. एम. डी.आर.

  6. काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता 

  7. औंध रावेत रस्ता

  8. निगडी वाल्हेकरवाडी रस्ता 

  9. टिळक चौक ते बिग इंडिया चौक 

  10. प्रसुनधाम सोसायटी रोड

  11. थेरगाव गावठाण रोड

  12. नाशिक फाटा ते मोशी रोड 

  13. वाल्हेकरवाडी रोड


उड्डाणपुलाखालील जागा/ ऑफ स्ट्रीट पार्किंग



  1. रॉयल ग्लोरी सोसायटी वाकड

  2. रहाटणी स्पॉट – 18 मॉल

  3. अंकुशराव लांडगे भोसरी सभागृह- भोसरी

  4. रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड

  5. भक्ती शक्ती फ्लाय ओव्हर- निगडी

  6. एम्पायर ईस्टेट फ्लाय ओव्हर- चिंचवड

  7. चाफेकर चौक ब्लॉक – 1 चिंचवड

  8. चाफेकर चौक ब्लॉक – 2 चिंचवड

  9. पिंपळे सौदागर वाहनतळ

  10. मधुकर पवळे उड्डाण पुल निगडी