पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याची गुन्हेगारी शहर म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. पुणे शहर सुरक्षित शहर मानलं जातं, मात्र या सुरक्षिततेला खुनांच्या मालिकेचं ग्रहण लागलं आहे. मागील पंधरा दिवसात पुण्यात 12 जणांची हत्या झाली आहे. विशेष म्हणजे 12 पैकी 10 हत्याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन आहेत.
या सर्व हत्या प्रकरणातील केवळ दोन हत्या गुन्हेगारीमधून झाल्या आहेत. इतर हत्या कौटुंबिक, वैयक्तिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तींकडून झाल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील हत्यांची मालिका
- वारज्यात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला
- दुसऱ्या दिवशीच पैशांवर निखील आंग्रोळकरचा खून झाला
- पर्वतीमध्ये सराईत गुन्हेगार निलेश वाडकरची हत्या झाली
- आंबेगावात व्यावसायिक रकीबचं ओसवाल यांचा खंडणीसाठी खून झाला
- कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ हत्येचा प्रकार उघडकीस आला
- सिंहगड रस्त्यावर अल्पवयीन मुलांनी वडिलांची हत्या केली
- कॅम्पमध्ये दारु पिण्यासाठीच्या जागेवरुन रफीक शेखची हत्या झाली
- फुरसुंगीत जुन्या भांडणातून मजुरांकडून एकाची हत्या झाली
- हडपसरमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरुन एका तरुणीचा हत्या झाली
- ताडीवाला रोडवर पित्यानेच पत्नीचा आणि मुलीचा खून केला
- सिंहगड रोडवर तरुणाचा कोयत्याने वार करुन हत्या झाली
- काल रात्रीच कर्वेनगरमध्ये एका तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन हत्या झाली
पुणे अफाट पसरलं आहे. बाहेरुन आलेल्यांची संख्या पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांचे लोंढे दिवसागणिक वाढत आहेत आणि त्या तुलनेत कायदा-सुव्यवस्थेचा धाक नाही. पुढील काळात असंच सुरु राहिलं तर तर पुणे हे क्राईम कॅपिटल होण्याच वेळ लागणार नाही.