पुणे : एखाद्या सिनेमात शोभेल असा प्रसंग पुण्याच्या स्वारगेट परिसरात घडला आहे. जमावाने हातात कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग केला. मात्र सुदैवाने एका दुकानात शिरुन शटर ओढल्याने हा तरुण बचावला. परंतु हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला.

पुणे-सातारा रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. एकमेकांकडे खुन्नसने बघितल्याने जमाव आणि तक्रारदार तरुणामध्ये भांडण झालं. तक्रारदार तरुण संध्याकाळी घरी जात असताना, तरुणांच्या गटाने हातात कोयता घेऊन त्याचा पाठलाग केला. सुदैवाने तरुण दुकानात शिरल्याने बचावला. त्याला बाहेर काढण्यासाठी जमाव शटर शस्त्राने तोडण्याचा प्रयत्न करत होते.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपी ते फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. सर्व आरोपींची ओळख पटली आहे. त्यापैकी तीन ते चार आरोपी अल्पवयीन आहेत.

दरम्यान, खुलेआम हिंसाचाराचा हा पुण्यातील एकमेव प्रसंग नाही. गेल्या 20 दिवसांत पुण्याच्या विविध भागांमध्ये एकूण 12 हत्या झाल्या आहेत.