IAS Probationers Pooja Khedkar: पुणे : ट्रेनी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि कुटुंबीयांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी ट्रेनी असतानाही आयएएस यांनी जिल्हाधिकारी असल्याप्रमाणे केलेला रुबाब, त्यांच्या खाजगी गाडीवर लावलेला लाल दिवा आणि त्यानंतर आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी पिस्तुल हातात घेत, शेतकऱ्यांवर केलेली दादागिरी यांसह समोर आलेल्या अनेक प्रकरणांमुळे आता पूजा खेडकर (Puja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Director General of Police Rashmi Shukla) यांनी मागवला आहे. 


ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी मागवला आहे. खाजगी गाडीवर अंबर दिव्याच्या वापर करणं, तसेच पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर  यांनी पिस्तूलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावणं यांसह पुजा खेडकर त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत कुठल्या कुठल्या कार्यालयात गेल्या होत्या, याचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत.               


स्थानिक पोलीस पूजा खेडकरांच्या घरी, बंददाराआड साडेतीन तास चौकशी 


वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांनी खेडकरांची भेट घेतली. खेडकरांची पोलिसांनी बंद दाराआड साडेतीन तास माहिती घेतली. वाशिम जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनं खुद्द पूजा खेडकर यांनी पोलिसांना काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली होती. उपविभागीय महिला पोलीस अधिकारी नीलिमा आरज यांच्यासह दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वाशिमच्या विश्रामगृह इथं पोहोचून पूजा खेडकर यांच्याकडून आरोपांसंदर्भात माहिती घेतली. 


दोषी सिद्ध होईपर्यंत मी निर्दोष : पूजा खेडकर 


पत्रकारांशी संवाद साधताना पूजा खेडकर यांनी आपल्यावरील आरोपांचं 'मीडिया ट्रायल' असं वर्णन केलं आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, लोक बघत आहेत आणि लवकरच सत्य बाहेर येईल. भारतीय संविधानानुसार आरोप सिद्ध होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला दोषी मानलं जाऊ शकत नाही, असंही त्या म्हणाल्यात. "मला जे काही म्हणायचंय, ते मी समितीसमोर बोलेन आणि जो निर्णय घेतला जाईल, तो मी स्वीकारेन.", असं पूजा खेडकर म्हणाल्या आहेत.