IAS Pooja Khedkar Update : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात आता पुण्यातील काही डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत वायसीएम रूग्णालयात चौकशी सुरू करण्यात आली आहे. पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) फिजिओथेरपी विभागाने डाव्या गुडघ्यात इजा आढळली नाही, असं म्हटलं असताना कोणत्या आधारावर अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.  


एबीपी माझाने वादग्रस्त IAS पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) आणि वायसीएम रुग्णालयाची पोलखोल केली होती. त्यानंतरचा सुधारित चौकशी अहवाल अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंनी तयार केलेला आहे. तो आज पिंपरी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंहांना सुपूर्त केला जाईल. शिकाऊ डॉक्टरने तपासणी कशी काय केली? फिजिओथेरपी विभागाने डाव्या गुडघ्यात इजा आढळली नाही, असं म्हटलं असताना कोणत्या आधारावर अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले? असे प्रश्न एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमुळं उपस्थित झाले होते. 


त्यानंतर पालिका आयुक्तांनी स्वतः चौकशीसाठी संबंधित सर्वांना बोलवून घेतलं होतं. डॉक्टर वाबळेंचा पहिला अहवाल फेटाळला त्यानंतर त्यांनी सुधारित अहवाल बनवण्याचे आदेश दिले होते. तोच सुधारित अहवाल आज पालिका आयुक्तांकडे पोहचणार आहे. मात्र आता यात कोणाला दोषी धरण्यात आलं आहे की डॉक्टर वाबळेंनी वायसीएमला क्लीनचिट देण्याचा प्रयत्न केला? हे आज समोर येणार आहे.


प्रमाणपत्र देण्यावर डॉक्टर वाबळेंची प्रतिक्रिया



याबाबतीत एबीपी माझाशी बोलताना डॉ. राजेश वाबळे म्हणाले, पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये 40 टक्के दिव्यांग असल्याचं लिहण्यात आलेलं आहे. त्यांंना आम्ही प्रमाणपत्रामध्ये जी टक्केवारी लिहण्यात आलेली ती 7 टक्के इतकी होती. कोणत्याही गोष्टीसाठी लागणारे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 40 टक्के दिव्यांगपणा लागतो. पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) अहमदनगरच्या रूग्णालयातून ते प्रमाणपत्र 2021 साली मिळालेलं होतं. मात्र, तरीदेखील पूजा खेडकरने पुण्यातील रूग्णालयात अर्ज केला. त्यानंतर पुण्यातील रूग्णालयातून 7 टक्के दिव्यांगपणा असल्याचं प्रमाणपत्र दिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 



प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला कार्मिक विभागाची नोटीस 



प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) कार्मिक विभागाने नोटीस पाठवली आहे. याबाबत 2 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर २ ऑगस्टपर्यंत उत्तर आले नाही तर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर मसूरीतील प्रशिक्षण केंद्रात हजर झालेली नाही. खेडकरला (IAS Pooja Khedkar) मसूरीत हजर राहण्याचे निर्देश होते. यापूर्वी कार्मिक विभागाने स्थापन केलेल्या समितीने खेडकरवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा अहवाल सादर केला आहे. त्यानंतर पुढील कारवाईपूर्वी खेडकरची बाजू ऐकली जावी म्हणून नोटीस जारी करण्यात आली आहे.