पुणे : राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजनेची सध्या राज्यभर चलती आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी महिलांना आपला अर्ज दाखल केला आहे. राज्य सरकारकडून 19 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे, या योजनेसाठी शासकीय स्तरावर अर्ज भरले जात असून लोकप्रतिनिधीही शिबीर भरवत आहेत. विविध माध्यमांतून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींना आवाहन केलं जात आहे. मात्र, अशाप्रकारे महिलांना लाडकी बहीण योजनेचं आवाहन करणं भाजप आमदाराच्या अंगलट आलं आहे. पुण्यातील (Pune) शिवाजी नगर परिसरात भाजप आमदाराने (MLA) लावलेल्या बॅनरवरुन आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या बॅनरवरुन महिलांनी थेट आमदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतली.  


पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसघात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या बॅनरवर सहमती शिवाय फोटो लावल्याचा आरोप बॅनरवर फोटो झळकलेल्या महिलांनी केला आहे. पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेचे बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचाही फोटो आहे. मात्र, या नेत्यांच्या फोटोसह या दोन महिलांचे फोटो देखील बॅनरवर लावले आहेत. या बॅनरवर झळकलेल्या महिलांपैकी एकीचं नाव नम्रता अंकुश कावळे तर दुसरीचं नाव भागीरथी माणिक कुरणे असं आहे. या दोन्ही महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. विशेष म्हणजे आमदाराने संमतीशिवाय योजनेच्या जाहिरातीवर आपले फोटो लावल्याने महिलांना थेट पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली. 


आमदाराकडून दिलगिरी


दरम्यान, कोणालाही दुखवण्याची आमची भावना नाही. ही योजना महिलांसाठी आहे, आमचा हेतू वाईट नाही, योगायोगाने हा फोटो त्या बॅनरवर आला आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी भावना आमदार शिरोळे यांनी या पोलीस तक्रारीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. मात्र, आमदार शिरोळे यांनी झळकावलेले बॅनर आणि त्यावरुन सुरू झालेल्या वादाची चंगलीच चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. 


1 कोटी महिलांचे अर्ज दाखल


राज्य सरकारने महिला भगिंनींना खुश करत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यानुसार, 21 ते 65 वर्षे वयापर्यंतच्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात मिळणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून सध्या या योजनेची माहिती गावपातळीपासून सर्वच स्तरावर पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळेच, योजनेला महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत 1 कोटी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. या योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधन सणाच्या पाश्वभूमीवर बँक खात्यात जमा होणार आहे.