IAS Pooja Khedkar : सध्या राज्यासह देशभरात चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस आधिकारी पूजा खेडकरचा (IAS Pooja Khedkar) आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडेकरने पिंपरी महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पूजाने ती पिंपरी चिंचवड हद्दीत राहते म्हणून, प्लॉट नंबर 52, देहू-आळंदी, तळवडे हा पत्ता रुग्णालयात दिलेला होता. त्याच ठिकाणी एबीपी माझाची टीम पोहचली असता, हा पत्ता रहिवाशी नसून एका कंपनीचा असल्याचं समोर आलं आहे.


पूजाने (IAS Pooja Khedkar) दिलेला पत्ता हा थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे, जी सध्या बंद अवस्थेत आहे. मात्र कंपनीचा पत्ता रहिवाशी म्हणून देत पूजा खेडकरने खोटी माहिती दिल्याचं, स्पष्ट झालं आहे. तिने दिलेल्या पत्त्यावरती रहिवाशी नसताना, या कंपनीच्या पत्त्यावर बनावट रेशन कार्ड ही बनवल्याचं आणि त्याचा वापर अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी झाल्याची बाब समोर आली आहे. ही थर्मोव्हेरिटा कंपनी तीच आहे, जिच्या नावावर अंबर दिवा लावलेल्या ऑडी कारची नोंद आहे. इतकंच नव्हे तर याच कंपनीचं गेल्या तीन वर्षांचं 2 लाख 77 हजार 688 रुपयांचं कर देखील थकीत आहे. पिंपरी पालिकेच्या कर संकलन विभागाकडून ही माहिती एबीपी माझाला प्राप्त झालेली आहे. याच थर्मोव्हेरिटा कंपनीचा शोध एबीपी माझाने लावला आहे. 


दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 



पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) अहमदनगर जिल्हा रुग्णालयामधून सुरूवातीला दोन दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याची माहिती समोर आली होती. नंतर त्या दोन्ही अपंग प्रमाणपत्रांचे एकत्रिकरण करून एकच प्रमाणपत्र देण्यात आलं असून त्यामध्ये पूजा खेडकर या 51 टक्के अपंग असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 


अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकरला दोन प्रमाणपत्र देण्यात आले होते. नंतर ते दोन्ही प्रमाणपत्रं एकत्र करून एकच दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. 2018 साली जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय मंडळाने दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात खेडकरला 40 टक्के दिव्यांग तर 2021 साली मानसिक आजाराच्या प्रमाणपत्रात 20 टक्के दिव्यांग असल्याच प्रमाणपत्रात नमूद असल्याचे डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले आहे. 


MBBS प्रवेश घेताना पूजा खेडकरने दिलं होतं फिट असल्याचं प्रमाणपत्र



वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) एम.बी.बी.एसचे शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केलेलं आहे. तिथे प्रवेश घेताना तिने पूर्ण फिट असल्याचे, कोणताही आजार नसल्याचे प्रमाणपत्र सादर केलं होतं.


त्यावेळी पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट देखील सादर केलं असल्याचं समोर आलं आहे. त्यांचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे अशी माहिती देखील समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांनी आपलं नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंद केलं होतं.


 


संबधित बातम्या:  IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर