पुणे : पत्नीची हत्या करुन आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून एक 78 वर्षीय पती बेपत्ता झाला आहे. पुण्यातील वानवडी परिसरातील फ्लॉवर व्हॅली सोसायटीमध्ये आज (2 ऑगस्ट) पहाटे ही घटना घडली. देविंदर कौर बिंद्रा (वय 66 वर्ष) असं मृत महिलेचं नाव असून आरोपी पती हरविंदर सिंह बिंद्राचा शोध सुरु आहे. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून हे कृत्य केल्याचं चिठ्ठीत म्हटलं आहे.

"अंथरुणाला खिळलेल्या पत्नीची 30 वर्षे शुश्रूषा केल्यानंतर अखेर यापुढे मला आता तिची शुश्रूषा करता येणार नाही. त्यामुळे पत्नीचा खून करुन मी आत्महत्या करणार आहे. यासाठी इतर कोणालाही जबाबदार धरु नये," अशी चिठ्ठी लिहून आरोपी हरविंदर सिंह बिंद्रा बेपत्ता झाले.

आज सकाळी उठल्यानंतर त्यांचा मुलगा रमेंद्र सिंह बिंद्रा यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टेमसाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिस बेपत्ता हरविंदर सिंह बिंद्रा याचा तपास करत आहेत.