पुणे : पुणेकर कधी काय करतील, हे सांगता येत नाही. पुण्यातली वाहतूक कोंडी तर एव्हाना जगाला माहित पडली आहे. पुण्यातील एखाद्या रस्त्यावर ट्राफिकमध्ये अडकलो तर तास-दीडतास वाया जाणारच. पुणेकर अनेकदा या ट्राफिकमधून कशीबशी सुटका करुन घेतात. परंतु जर पुण्यातल्या ट्राफिकमध्ये रणगाडा अडकला तर काय होईल. याचा अंदाज बांधणे जरा कठीणच आहे.

पुण्याच्या विश्रांतवाडीमधे असाच एक गमतीशीर प्रकार पहायला मिळाला आहे. भारतीय सैन्य दलाचा एक रणगाडा बॉंम्बे स्यापर्स या संस्थेतुन डीआरडीओ या दुसऱ्या ठिकाणी न्यायचा होता. मात्र त्यासाठी जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. पुण्यातील लोक रणगाड्यालाही रस्ता देत नाहीत. शिवाय रणगाड्याला हॉर्न नसतो, त्यामुळे या रणगाड्याच्या पुढे एक सैन्याचा एक ट्रक हॉर्न वाजवत चालत होता. रस्त्याच्या कडेला कुठेही उभ्या केलेल्या गाड्या आणि पादचाऱ्यांना हटवण्यासाठी जवानांना वेळोवेळी ट्रकमधून उतरावे लागत होते. गाड्या रस्त्यातून बाजूला कराव्या लागत होत्या. तरीही लोक त्यांच्याच धुंदीत होते. काही दुचाकीस्वारांनी तर रणगाडा आणि त्याच्यापुढे चालणाऱ्या ट्रकच्या मधल्या जागेत त्यांच्या दुचाकी आडव्या घालून वाट काढण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यावरुन रणगाडा जात असतानासुद्धा लोक रस्त्याच्या मधून चालत होते. पुण्यातील वाहतूक समस्या आणि त्याकडे पाहण्याचा पुणेकरांचा दृष्टीकोन कसा आहे. हे या घटनेद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. युद्धाच्या मैदानात चाल करून जाणे हे पुण्यातील रस्त्यांवरून चालण्यापेक्षा सोपे असल्याचे य घटनेमुळे पहायला मिळत आहे. पुण्यातील रस्त्यांवरुन प्रवास करणे या रणगाड्यासाठी अडथळ्यांची शर्यत ठरली